धामापूर सड्यावर आढळली कातळशिल्पे ; शिकारीचे कातळशिल्प, गुहा,आणि दगडी हत्यारे यांचा समावेश

 जिल्ह्यात प्रथमच सापडले शिकारशिल्प – कातळशिल्प अभ्यासक सतीश लळीत यांचा दावा

चौके (अमोल गोसावी) : काही दिवसांपुर्वी धामापूर सड्यावर ज्या ठिकाणी साळेल गावातील तरुणांना दोन कातळशिल्पे आढळली होती. त्या परिसराची पाहणी प्रसिद्ध कातळशिल्प अभ्यासक श्री सतीश लळीत यांनी नुकतीच केली. त्यावेळी त्यांना धामापूर, साळेल आणि मोगरणे गावच्या सीमेवरील सड्यावर आणखी कातळशिल्पांचा शोध लागला आहे. महत्वाचे म्हणजे या ठिकाणी प्रथमच शिकारी आणि रानडुक्कर यांचे कातळशिल्प, तसेच अश्मयुगीन गुहा आणि काही दगडी हत्यारे सापडली आहेत, म्हणूनच धामापूर , साळेल चा पठारी भाग पुरातत्त्व विभागाच्या दृष्टीने महत्वाच्या असून या मानवनिर्मित अवशेषांचे जतन होणे गरजेचे आहे. अशी माहिती कातळशिल्प अभ्यासक सतीश लळीत यांनी दिली.
 
दरम्यान साळेल येथील युवक परेश गावडे, नंदू गावडे, गणेश गावडे यांना काही दिवसांपूर्वीच ते अळंबी शोधण्यासाठी गेले असता धामापूरच्या सड्यावर गोड्याची वाडी हद्दीत दोन कातळशिल्पे आढळून आली होती. सिद्धेश आचरेकर, अनिकेत पाटील यांनी या युवकांसह त्या ठिकाणी जाऊन या कातळशिल्पांची स्वच्छता केली व त्याभोवती दगड रचून ठेवण्याचे कौतुकास्पद काम केले. त्याबद्दल या सर्व तरुणांचे सतीश लळीत यांनी कौतुक केले तर या परीसरात वाढत असलेल्या चिरेखाणींमुळे कातळशिल्पांच्या आस्तित्वास धोका पोचू शकतो अशी भिती सुध्दा कातळशिल्प अभ्यासक सतीश लळीत यांनी व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!