कणकवली (प्रतिनिधी) : सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बसस्थानक व रेल्वे स्थानकांसह सार्वजनिक ठिकाणी आरोग्य तपासणी पथके कार्यरत ठेवणे, बसस्थानक परिसरातील खड्डे बुजवणे, बसस्थानक परिसरातील चौकीत पोलीस तैनात ठेवणे, मुंबई गोवा – महामार्ग चौपदरीकरणाची अर्धवट कामे पूर्ण करणे, याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात यावी, अशी आग्रही मागणी कणकवली तालुका प्रवासी संघातर्फे करण्यात आली आहे. याबाबतची निवेदने संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, गणेशोत्सवासह दसरा व दिवाळी सणांसाठी मुंबई, पुणे यांसह अन्य महानगरांतून मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात येत असतात. महानगरांतून येणाऱ्या प्रवशांसोबत तापसणी, डोळे साथ, हिवताप, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू यासह अन्य साथींचे आजार डोके वर काढतात. हे आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने सार्वजनिक ठिकाणी आरोग्य तपासणी पथके कार्यरत ठेवावी. सिंधुदुर्गातील बसस्थानकांतील परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्याचा त्रास एसटीचे चालक व वाहकांसह प्रवाशांना होत आहे. ते खड्डे गणेशोत्सवापूर्वी त्वरित बुजवण्यात यावेत. स्थानक परिसर स्वच्छ ठेवणे व त्याठिकाणी असलेली स्वच्छतागृहांची निर्जंतुकीकरण एसटी प्रशासनाने करावे.
सण व उत्सव काळात बसस्थानक परिसरात प्रवाशांची मोठी वर्दळ असते. याचा फायदा चोरटे घेत महिलांचे दागिने व प्रवशांचे पाकिटे लंपास करतात. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षितेतेच्यादृष्टीने पोलीस प्रशासानाने चौकीत पोलीस तैनात ठेवावेत. याच काळात होणारी गर्दी लक्षात घेत गर्दीवर ठेवण्यासाठी उपाययोजना पोलीस प्रशासनाने कराव्यात. मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामांतर्गत बहुतांश कामे अर्धवट स्थितीत असून अनेक ठिकाणी सुविधांचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे अर्धवट स्थितीत असलेली कामे व सुविधांचा अभाव दूर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने करावा. या सर्व मागण्यांचा संबंधित अधिकाऱ्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यावर त्वरित कार्यवाही करावी, अशी रास्त अपेक्षा संघटनेची आहे.












