कुडाळ ( अमोल गोसावी ) : जि. प. शाळा कुडाळ कुंभारवाडा यांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधून पोलीस ठाणे कुडाळ येथे जाऊन अनोखे रक्षाबंधन केले. समाजातील सर्व घटकांचे रक्षण करण्याचे कार्य पोलिसांकडून होत असते. पोलिसांच्या या अहर्निश कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कुंभारवाडा शाळेतील विद्यार्थिनी व महिला शिक्षकांनी सर्वच महिला व पुरुष पोलिसांना रक्षाबंधन केले. याप्रसंगी कुडाळ पोलीस निरीक्षक मुल्ला यांनी मुलींना मार्गदर्शन करून रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या. पोलिसांच्या एकंदर कार्यपद्धतीविषयी मार्गदर्शन करण्यात आले, तसेच तक्रार दाखल कशी करावी, महिला व मुली या विषयी विशेष कायदे, मुलांची सुरक्षितता यांविषयी मार्गदर्शन केले. पोलीस ठाण्यातील व्यवस्थापन, पोलीस कोठडी याविषयी माहिती सांगितली. पोलीस समाजाचे रक्षण करत असताना स्वतःच्या कुटुंबाकडेही त्यांना लक्ष देता येत नाही. पोलीस खाकी मधल्या मानवी मनाविषयी आपुलकी दाखविणाऱ्या या बालिकांच्या कृतीचे सर्वच पोलीस दलाने मनापासून कौतुक केले. समाज रक्षणासाठी कार्य करणाऱ्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे हे अनोखे रक्षाबंधन सर्वांसाठीच आदर्शवत असेच आहे.
या प्रसंगी कुडाळ कुंभारवाडा शाळेच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली सावंत, नगराध्यक्ष भोगटे , आंगणे, कदम, गावडे, लाड, गोसावी, तांबे, पाटील उपस्थित होते.
कुडाळ कुंभारवाडा शाळेने केले पोलिसांना राखीबंधन












