तळेरे (प्रतिनिधी) : कासार्डे विकास मंडळ, मुंबई यांच्या मागण्यानुसार कासार्डे ग्रापचे सरपंच निशा नकाशे व उपसरपंच गणेश पाताडे यांच्या माध्यमातून कासार्डे येथील एम. एम. सी. या मायनिंग कंपनी मार्फत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची भौतिक गरज ओळखून उत्तम दर्जाचे 25 बँच भेट म्हणून दिले आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीच्या आणि परिश्रमाच्या आधारे शाळेचे, गावचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन कंपनीचे माईन्स मॅनेजर कमलेश झा यांनी केले. याशिवाय कासार्डे विद्यालयाला यापुढेही मागणीप्रमाणे भरभरून मदत करण्याची ग्वाही कंपनीचे कमलेश झा यांनी कासार्डे विद्यालयात छोटेखानी आयोजित कार्यक्रमात दिली.
याप्रसंगी व्यासपीठावर स्कूल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर,कंपनीचे सीओओ मनिष नाईक, संस्था पदाधिकारी प्रभाकर कुडतरकर,रविंद्र पाताडे,जि.प.सदस्य संजय देसाई, कासार्डे गावच्या सरपंच निशा विद्याधर नकाशे,उपसरपंच गणेश पाताडे, कासार्डे मायनिंग सोसायटीचे पदाधिकारी किशोर कुडतरकर, प्राचार्य एम.डी. खाड्ये,संस्था सदस्य प्रभाकर नकाशे,ग्राप सदस्य मिलींद पाताडे, प्रणिल शेट्ये,माईन्स मेट संतोष पेडणेकर,पत्रकार गुरुप्रसाद सावंत व पर्यवेक्षक एन.सी.कुचेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रथम गुलाब पुष्प देऊन उपस्थितांचे स्वागत प्राचार्य एम.डी.खाड्ये यांनी केले. याप्रसंगी संस्था पदाधिकारी रवींद्र पाताडे,जि.प.सदस्य संजय देसाई व प्रभाकर कुडतरकर यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोबाईलपासून दुर राहुन पुस्तकांची दोस्ती करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन एन.सी कुचेकर यांनी केले.
















