“त्या ” मुस्लिम युवतीवर कडक कारवाई करा

कणकवली तालुका मुस्लिम समाजाचे पोलिसांना निवेदन

कणकवली (प्रतिनिधी): स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजवर आम्हा मुस्लिम बांधवांच्या पिढ्या कणकवली शहरासह तालुक्यात सर्वधर्मीय बांधवांशी सलोख्याने वागत आहेत. हिंदू मुस्लिम एकतेची अनेक उदाहरणे कणकवली शहरासह तालुक्यात आहेत. असे असताना पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करा , हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या त्या परप्रांतीय मुस्लिम युवतीमुळे हकनाक सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा आम्ही निषेध करत असून त्या युवतीवर कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे कणकवली तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी बोलताना आसिफ नाईक म्हणाले की घडलेली घटना ही लांच्छनास्पद आहे.केवळ कणकवली तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिंदू मुस्लिम समाज एकोप्याने राहतो आहे.दोन्ही धर्मियामध्ये सलोख्याचे वातावरण आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सर्वधर्मसमभाव या तत्वानुसार चालत असून हे संपूर्ण राज्यात आदर्श असे उदाहरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अबिद नाईक म्हणाले की कणकवली शहरवासीयांचे आदरस्थान असलेले हिंदू धर्मियांचे पटकीदेवी मंदिर हे आम्हा मुस्लिम समाजबांधवांच्या जागेत असून आम्ही पटकीदेवी मंदिराचे मानकरी ही आहोत.परमपूरजय भालचंद्र महाराजांचे आम्ही भक्त आहोत. शहरात हिंदू मुस्लिम समाज अत्यंत गुण्यागोविंदाने नांदत आहे. असे असताना व्यवसायासाठी कर्नाटकातून इथे आलेल्या मुस्लिम कुटुंबातील त्या युवतीकडून घडलेला प्रकार हा निंदनीय असून त्याची सखोल चौकशी करावी.पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी चर्चेदरम्यान त्या युवतीवर सखोल चौकशीअंती योग्य की कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले. यावेळी हनिफ पिरखान, आजीम कुडाळकर, निसार शेख, शानु शहा, फारूक शेख, उमर शेख, अनिस नाईक, इम्रान शेख, जावेद शेख, रशीद शेख, अस्लम निशनदार, मोहिद्दीन गिरकर, अख्तर गिरकर, फैय्याज कुडाळकर, सर्फराज शेख, सलाम पटेल, सलमान शेख, महंमद शेख, अमजद शेख आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!