नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचा यशस्वी पाठपुरावा
कणकवली (प्रतिनिधी): नवीन कुर्ली पुनर्वसन गावठण स्थापन होऊन कित्येक वर्ष झाली तरी नवीन कुर्ली गावासाठी स्वतंत्र रेशन दुकान नव्हते . काही ग्रामस्थांचे रेशन दुकान जुनी कुर्ली या ठिकाणी तर काहींचे फोंडाघाट या ठिकाणी होते त्यामुळे सर्व सामान्य लोकांना खूप त्रास सहन करावा लागत होता. म्हणून नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाने नवीन कुर्ली गावासाठी स्वतंत्र रास्त धान्य दुकानाची मागणी करून यशस्वी पाठपुरावा केला आणि स्वतंत्र रास्त धान्य दुकान मंजूर करून घेतले. या स्वतंत्र रास्त धान्य दुकानाचा परवाना कणकवली तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांनी नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते यांच्याकडे सुपूर्त केला या प्रसंगी माजी सभापती मनोज रावराणे, ग्रामविकास मंडळाचे उपाध्यक्ष सुरज तावडे ,सचिव धीरज हुंबे, अमित दळवी,मंगेश मडवी इतर ग्रामस्थ उपस्थित होते. गेली २० ते २२ वर्षे रेशन दुकान गावात नसल्यामुळे लोकांनी खूप त्रास सहन केला होता त्यामुळे नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाने केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.












