दोडामार्ग (प्रतिनिधी) : कुडासे- भरपालवाडी येथील एका घराचे कौले काढून ७० हजार रुपये लंपास केल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. संजना संजय धुरी (४४) यांच्या घरात ही चोरी झाली असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार येथील पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली. कुडासे-भरपालवाडी येथील संजना धुरी हे त्यांचे पती व एका मुली समवेत राहतात. त्यांची दुसरी मुलगी शिक्षणासाठी बाहेरगावी असते. संजना धुरी या अंगणवाडी सेविका असून त्यांची मुलगी कॉलेज करते. त्यांची मुलगी सकाळी कॉलेजला गेली. पती कामानिमित्त गेले व संजना धुरी यादेखील सकाळी १० वाजता रोजच्याप्रमाणे कामावर निघून गेल्या. दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेजारणीने फोन करून सांगितले की मुलगी घरात रडत आहे व घरातील कपाट उघडे आहे. संजना धुरी यांनी घरी येऊन बघितले असता मुलगी रडत असल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी मुलीला सर्व हकीगत विचारली. यावेळी घराच्या छपराची कौले काढलेली व कपाट उघडे दिसले. कपाटात जाऊन पाहिले असता कपाटाचे लॉकर उघडे होते व त्यातील ७० हज़ार रुपये चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. दागिन्यांचा बॉक्स तसाच होता. या चोरीची संजना धुरी यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली.
घरफोडी ; छप्पराची कौले काढून रोख रक्कम चोरली












