ओरोस (प्रतिनिधी) : आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या यात्रे मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बिमा बांबू लागवड मिशनची सुरुवात करण्यात आली. माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या संकल्पनेतून व नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हामध्ये बिमा बांबू लागवड मिशन हाती घेण्यात आले आहे. आंगणेवाडी भराडी देवीच्या यात्रेचे औचित्य साधून आंगणे देवस्थान समितीच्या सदस्यांना मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते बिमा बांबूची रोपे देऊन या मिशनला सुरुवात करण्यात आली. या बांबू पासून मोठया प्रमाणात इथेनॉल, सी एन जी व कार्बन निर्मिती करता येणार आहे. माजी खासदार सुधीर सावंत यांनी स्थापन केलेल्या कृषि विज्ञान केंद्र किर्लोस द्वारे हे मिशन राबविण्यात येणार आहे. या वर्षी एक लाख बिमा बांबू लागवडीचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे.
खासदार सुधीर सावंत यांनी देशामध्ये नैसर्गिक शेतीची चळवळ उभी केली. पाच वर्षा पूर्वी आंगणेवाडी येथे कृषि विज्ञान केंद्र किर्लोस द्वारे नैसर्गिक शेती कार्यक्रमाची सुरुवात केली. आता आंगणेवाडी येथे नैसर्गिक पद्धतीने आंबा व काजू मोठ्या प्रमाणात पिकविला जातो. नैसर्गिक शेती मध्ये केलेल्या प्रगती साठी आंगणे वासीयांचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते खास सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नारायण राणे, शिक्षण मंत्री दिपक केसरकर,उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार सुधीर सावंत, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार नितेश राणे, आमदार किरण पावसकर, राजन तेली, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. विलास सावंत, शास्त्रज्ञ विकास धामापूरकर, सुमेधा तावडे, सुयश राणे, मनवेल फर्नांडिस, झिलू घाडीगांवकर, दीपक सावंत व आंगणेवाडी देवस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.