वैभववाडी (प्रतिनिधी) : स्वराज्य सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा सन २०२६ चा मानाचा राज्यस्तरीय ‘कृषिरत्न’ पुरस्कार वैभववाडी येथील प्रगतशील शेतकरी व कृषी उद्योजक अभिजीत (राजू) दशरथ पवार यांना जाहीर झाला आहे. शेती, उद्योजकता आणि सामाजिक बांधिलकी या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
‘मान कर्तृत्वाचा… सन्मान नेतृत्वाचा’ या ब्रीदवाक्याला साजेसे कार्य करत राजू पवार यांनी वैभववाडी तालुक्यात कृषी क्षेत्रात नवे आदर्श निर्माण केले आहेत. काजू उत्पादनासोबतच त्यांनी बांबू व सागवान लागवडीचे यशस्वी प्रयोग राबवले असून, त्यांच्या प्रगतशील दृष्टिकोनामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांना नवे मार्गदर्शन मिळत आहे.याशिवाय राजू पवार हे वैभववाडी बाजारपेठेतील एकमेव वृत्तपत्र विक्रेते म्हणूनही ओळखले जातात. त्यांच्या वडिलांकडून चालत आलेला वृत्तपत्र विक्रीचा वारसा ते आजही प्रामाणिकपणे पुढे नेत आहेत. या माध्यमातून परिसरातील शेकडो वाचकांना दररोज वृत्तपत्रे उपलब्ध करून देत ते ज्ञानदानाची परंपरा जपण्याचे कार्य करत आहेत.शेती आणि व्यवसायाबरोबरच त्यांनी नेहमी सामाजिक बांधिलकी जपत समाजकार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. गरजू व्यक्तींना मदतीचा हात देणे, गावपातळीवर विविध सामाजिक उपक्रमांत सहभागी होणे यामुळे त्यांची प्रतिमा एक समाजाभिमुख कार्यकर्ते म्हणून निर्माण झाली आहे.
स्वराज्य सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत त्यांच्या या सर्वांगीण कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. रविवार, दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता अहिल्यानगर येथील सावेडी रोडवरील ‘माऊली संकुल सभागृह’ येथे आयोजित भव्य सन्मान सोहळ्यात त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास सरपंच संघटित चळवळीचे प्रणेते व संघाचे सचिव बाबासाहेब पावसे पाटील, अध्यक्ष रोहित संजय पवार, संपर्क प्रमुख अमोल शेवाळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.राजू पवार यांना जाहीर झालेल्या या राज्यस्तरीय कृषिरत्न पुरस्काराबद्दल वैभववाडी तालुका तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.












