सावंतवाडी (प्रतिनिधी) : मळगाव येथील सुप्रसिद्ध दशावतार नाट्य कलाकार नितीन आसयेकर यांना राष्ट्रीय नवरत्न पुरस्कार २०२३’ प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे कला या विभागात दशावतार क्षेत्रातून आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरणारे व तीन राज्यस्तरीय पुरस्कारांची हॅट्रिक केल्यानंतर हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे दशावतार क्षेत्रातील ते पहिलेच कलाकार ठरले.
‘राष्ट्रीय नवरत्न पुरस्कार २०२३’ विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. हा पुरस्कार भारतातील विविध क्षेत्रातील विशेष कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी बहाल करण्यात येतो. आणि प्रथमच कला या क्षेत्रातून महाराष्ट्रातील कोकणच्या दशावतार या आपल्या सर्वांच्या लाडक्या लोककलेची यात दखल घेण्यात आली. या दशावतार क्षेत्रात अगदी कमी वयात उत्कृष्ट व विविधांगी भुमिका साकारून केलेल्या अलौकिक कार्यासाठी निवडक नवरत्नांमध्ये नितीन आसयेकर यांची निवड करण्यात आली. एरोली, नवी मुंबई येथे राष्ट्रीय नवरत्न पुरस्कार वितरण समारंभात शशिकांत खामकर यांच्या हस्ते नितीन आसयेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतातील विविध क्षेत्रातील नामांकीत व्यवसायिक, सिनेसृष्टीतील नाट्यकर्मी तसेच पुरस्कार विजेते या समारंभास तसेच नितीन आसयेकर फॅन क्लब ग्रुपचे सदस्य राजेश म्हापणकर, पांडुरंग पालव, स्वप्नील पालव या कार्यक्रमास उपस्थित होते. राजेश म्हापणकर यांनी आपल्या सुरेल आवाजात हिंदी गाण्याने समारंभात रंगत आणली तसेच विविध नृत्याविष्काराने अनेक कलाकारांनी उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या जोडीने हा सोहळा संपन्न झाला. नितीन आसयेकर यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.