प्रधान मंत्री ग्रामसडक योजना अधिकार्यांना धरले धारेवर
आठ दिवसात तोडगा काढण्याचे उपअभियंता यांचे ग्रामस्थांना आश्वासन
आचरा (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २०२२ मध्ये झालेल्या चिंदर भटवाडी, पालकरवाडी, साटमवाडी, लब्देवाडी, भगवंतगड रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत प्रधान मंत्री ग्रामसडक सडक योजना कार्यालयात वारंवार ग्रामस्थ, ग्रामपंचायत यांच्या लेखी तक्रारी, मेल करुनही सदर कार्यालयाकडून कोणतेही उत्तर मिळत नसल्याने चिंदर ग्रामपंचायत कार्यालय येथे शुक्रवार १३ मार्च रोजी ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
ग्रामपंचायतच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित बैठकीत ग्रामस्थांनी उग्र रूप धारण करत. बैठकीस उपस्थित उपअभियंता प्रदीप भोसले तसेच कनिष्ठ अभियंता साई चव्हाण यांना चांगलेच धारेवर धरले. आम्हाला सदर रस्त्याचे काम पूर्ण हवे. या रस्त्यावर अनेक अपघात होत आहे, तसेच एका युवकाचा अपघात होऊन त्याचा डोळा निकामी झाला आहे याची जबाबदारी आपण घ्यावी, रस्ता सुरळीत व्यवस्थित करून द्या. आम्हाला समर्पक उत्तर द्या अन्यथा तुमचे वरीष्ठ येई पर्यंत सभागृहात कोंडून ठेवू अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली.
उपकार्यकारी अभियंता निरूत्तरीत
ग्रामस्थांकडून प्रश्नांचा भडीमार होत असताना उपकार्यकारी अभियंता प्रदीप भोसले तसेच कनिष्ठ अभियंता साई चव्हाण यांच्याकडे ग्रामस्थांच्या तक्रारी व रस्त्यासबंधी कोणतीही लेखी आणि योग्य माहिती नसल्याने ते निरुत्तरीत झाले.
भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची शिष्टाई
आम्ही तुम्हाला आठ दिवसाचा अवधी देत आहोत. ग्रामस्थांच्या सर्व तक्रारीचे समर्पक निवारण करा, ग्रामस्थांच्या भावनांचा उद्रेक होण्याची वाट पाहू नका अन्यथा आमच्या परीने आम्ही भूमिका घेऊ असे खडे बोल उपअभियंता भोसले यांना सुनावत ग्रामस्थांच्या मध्ये शिष्टाईची भूमिका घेतली.
आठ दिवसांत ग्रामस्थांच्या तक्रारी निवारण करुन रस्त्याबाबत योग्य मार्ग काढू – उपअभियंता भोसले
आपण याबाबत वरीष्ठाशी व ठेकेदारांशी चर्चा करून ग्रामस्थांच्या तक्रारी व रस्त्यासबंधी आठ दिवसांत योग्य तो मार्ग काढतो असे आश्वासन उपअभियंता प्रदीप भोसले व कनिष्ठ अभियंता साई चव्हाण यांनी दिले.
आचरा भगवंतगड रस्त्यांच्या कामाबाबत ग्रामस्थांची नाराजी
गेले दोन वर्षे सुरू असलेल्या आचरा भगवंतगड रस्त्याने धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे तसेच अपघात होत आहेत या बाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रस्त्याच्या कामातील दिरंगाई मुळे शाळेतील मुलांचे हाल होत असून सध्या परिक्षेचा कालावधी आहे. रस्त्याचे काम लवकरात करावे अशी उपअभियंता यांच्याकडे मागणी केली.
यावेळी सरपंच नम्रता महांकाळ, पंचायत समिती सदस्य दिपक सुर्वे, संतोष गांवकर, प्रकाश मेस्त्री, देवेंद्र हडकर, गोपाळ लब्दे, विनोद लब्दे, प्रिया पालकर, अजित साटम, आत्माराम पालकर, प्रतिक पाटणकर, सविता लाड, नेत्रा लाड, उर्मिला लब्दे, सोनाली पाटणकर, आकांक्षा परब, योगेश चव्हाण, भास्कर साटम, संदिप साटम, भानजी साटम, अजित लब्दे, आशिष रावराणे, चंद्रकांत लब्दे, यशवंत लाड, स्वप्नील मिठबांवकर, जे. पी. साटम, श्रृतीका कातवणकर, गणपत चिंदरकर, पो.पाटील दिनेश पाताडे, सोनाली माळगांवकर, चिन्मयी पाताडे, प्रतिक्षा पालकर, सचिन आचरेकर, मंगेश नाटेकर, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.











