फोंडाघाट महाविद्यालयात भूगोल भित्तीपत्रिकेचे उद्घाटन !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : मानवी जीवनातील सर्व घटकांचा अविभाज्य भाग म्हणजे भूगोल असून पृथ्वी, पर्यावरण, संसाधने आणि मानव यांचा परस्परसंबंध समजून घेण्यासाठी भूगोल अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळेच भूगोलाला विज्ञानाची जननी असे म्हटले जाते, असे प्रतिपादन गव्हर्नमेंट कॉलेज खंडोला, गोवा येथील प्रा. डॉ. प्रबिर कुमार रथ यांनी केले. महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या वतीने भूगोल विषयातील नाविन्यपूर्ण संशोधनावर आधारित भित्तिपत्रिकेचे आयोजन करण्यात आले होते. या भित्तिपत्रिकेचे उद्घाटन प्रा. डॉ. प्रबिर कुमार रथ यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. राजाराम पाटील यांनी सांगितले की, आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांना झाला पाहिजे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पना, भावना आणि अभ्यासातून मिळालेली माहिती भित्तिपत्रिकेच्या माध्यमातून मांडली, तर त्यातून त्यांची सर्जनशीलता आणि अभ्यासाची आवड वाढते.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. रथ म्हणाले की, आपण कुठे राहतो, जीवनासाठी कोणते घटक आवश्यक आहेत, नैसर्गिक साधनसंपत्तीचे साठे कुठे आढळतात, तसेच पर्यावरण आणि मानवी जीवनातील बदल कसे घडतात याची सखोल माहिती भूगोल या विषयातून मिळते. त्यामुळे भूगोलाचा अभ्यास हा केवळ शैक्षणिक नसून जीवनाशी निगडित आहे.
संस्थेचे अध्यक्ष महेश सावंत यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मानवाचे राहणीमान, घरांचे प्रकार, पर्वत, नद्या, शेती, पिकांचे प्रकार, रस्त्यांचे जाळे आणि हवामान यांसारख्या विविध घटकांच्या प्रतिमा व त्यांचे विश्लेषण या भित्तिपत्रिकेमध्ये सादर करण्यात आले आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भूगोल विषयाविषयीची आवड निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी सांगितले की, भित्तिपत्रिका हे विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचा अनमोल ठेवा आहे. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना संशोधनात्मक दृष्टिकोन विकसित करण्याची संधी मिळते. विविध प्रदेशांतील महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती संकलित करून विद्यार्थ्यांनी ती इतरांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला कोकण जिओग्राफर्स संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ शिवराम ठाकूर उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, अशा प्रकारचे शैक्षणिक उपक्रम वर्षातून अनेक वेळा आयोजित केले, तर विद्यार्थ्यांमध्ये विषयाची गोडी निर्माण होऊन त्यांची संशोधनवृत्ती विकसित होण्यास मदत होईल.
कार्यक्रमाचे आभार प्रा. विनोदसिंह यांनी मानले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध माहितीपूर्ण व आकर्षक भित्तिपत्रिकांचे उपस्थितांनी कौतुक केले.











