मनसेच्या पाठपुराव्याला यश
कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या माहितीसाठी हेल्पलाइन नंबरचे बोर्ड लावण्यात यावेत. तसेच स्पीड बाबतचे बोर्ड लावण्या सोबतच इतर आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी मनसेने केली होती. त्यानंतर आरटीओ कडून तातडीने कार्यवाही होत बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर महामार्गावर फलक लावण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्यात आल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी महामार्गाच्या समस्यांबाबत आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आरटीओ कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण वाहतूक पोलीस व मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत महामार्गावर वेगाबाबतचे फलक लावणे रुग्णवाहिका व हेल्पलाइन बाबत फलक लावणे, झाडी साफसफाई करणे, गटार साफसफाई आदी बाबतची कार्यवाही तात्काळ करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तसेच ही कार्यवाही चार ते पाच दिवसात सुरू करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आल्याने मनसे कडून 11 सप्टेंबर रोजी होणाऱ्या आंदोलन स्थगित करण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर महामार्गावर आवश्यक हेल्पलाइन सहित फलक लावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून उर्वरित कामेही तातडीने करण्यात येणार असल्याने प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे












