नियमित वेळापत्रक गाठण्यासाठी लागणार अजूनही उशीर
कणकवली (प्रतिनिधी) : 24 तास उलटून गेल्यानंतर अखेर कळंबोली येथील रेल्वे मार्गावरील ट्रॅकवरून घसरलेले डबे हटविण्यात आल्यानंतर मुंबईच्या दिशेने जाणारा एक ट्रॅक रेल्वे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. अप व डाऊन या दोन्ही रेल्वे या ट्रॅक वरून धीम्या गतीने मार्गस्थ करण्यात आल्या असून 24 तासानंतर कोकण रेल्वेची वाहतूक धक्के खात सुरू झाली. 24 तास उलटून गेल्यानंतरही अजूनही सुरळीत वाहतूक सुरू झाले नसल्याने उद्याचा दिवसही कोकण रेल्वे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. त्यातच कोकण रेल्वे ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या संपूर्ण प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी स्टेशनवर थांबवल्याने या ठिकाणी रेल्वे प्रवाशांना कोणत्याही सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्रास सहन करावा लागला. सिंधुदुर्गातील अनेक स्टेशनमध्ये थांबवून ठेवलेल्या रेल्वे आता हळूहळू मार्गस्थ होऊ लागल्या आहेत.