कार्यक्रम ठाकरे सेनेचा.. चर्चा नितेश राणेंच्या विकासकामांच्या बॅनर ची !

विशेष संपादकीय

राजन चव्हाण – संपादक : राजकारणात कधी कोणत्या मुद्द्याला फोकस करावे आणि कोणत्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करावे किंबहुना लक्षपूर्वक दुर्लक्ष करावे हे समजणे अत्यंत महत्वाचे असते.कणकवली विधानसभा मतदारसंघात ठाकरे शिवसेनेच्या वतीने ” होऊ द्या चर्चा… विचारा प्रश्न” हा भाजपच्या केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची चिरफाड करणारा कार्यक्रम कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघात आणि मालवण कुडाळ मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कडून घेण्यात आला. कणकवली शहरातील होऊ द्या चर्चा कार्यक्रमात केंद्र आणि राज्य सरकार च्या फसव्या आश्वासनांची चिरफाड करणे, जनतेला केंद्र आणि राज्य सरकारने कसे फसवले आहे हे जनतेला पटवून देणे, जनतेच्या मनातील आपली फसवणूक मोदी सरकारकडून झाली असल्याची भावना वक्त करायला व्यासपीठ देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. कणकवली शहरातील कार्यक्रमात ठाकरे सेनेच्या होऊ द्या चर्चा कार्यक्रमस्थळी पटवर्धन चौकात आमदार नितेश राणेंनी फक्त एका वर्षात 2 हजार 217 कोटीहून अधिक निधींच्या विकासकामांचा केलेला बॅनर कणकवली भाजपाच्या वतीने मुद्दाम लावण्यात आला होता. आणि ठाकरे सेनेच्या होऊ द्या चर्चा या कार्यक्रमात नेमकं ह्याच बॅनर वरून टिक्काटिपनी करणारी विधाने ठाकरे सेनेच्या प्रमुख वक्त्यांकडून झाली. आणि हेच नेमकं भाजपाला हवं होतं..कार्यक्रम ठाकरे सेनेचा असला तरी चर्चा मात्र नितेश राणेंच्या बॅनर ची व्हायला हवी हे इप्सित एक बॅनर लावून भाजपा कार्यकर्त्यांनी साध्य केले. 6 ऑक्टोबर रोजी देवगड तालुक्यात पडेल, वैभववाडी शहरात छत्रपती संभाजी चौक आणि कणकवलीत पटवर्धन चौकात शिवसेना उबाठा कडून होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्याआधी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी स्थानिक पातळीवरील खोचक 10 प्रश्न आमदार नितेश राणेंना विचारणारा बॅनर होऊ द्या चर्चा कार्यक्रमस्थळी, कणकवली शहरातील मोक्याच्या ठिकाणी आणि तालुक्यातही बाजारपेठांच्या ठिकाणी लावून आमदार नितेश राणेंना टार्गेट केले होते. कणकवलीत शहरातील ठाकरे सेनेच्या कार्यक्रमाआधी कणकवली तालुका भाजपाच्या वतीने आमदार नितेश राणे यांनी मागील वर्षभरात 2 हजार 200 कोटींहून अधिक विकासकामांसाठी निधी आणला, मागील 8 वर्षांत कुडाळ मालवण मतदारसंघात काय काम केले ? हा सवाल करणारा बॅनर झळकवून आमदार वैभव नाईक आणि ठाकरे सेनेला डीवचण्याचा प्रयत्न केला होता. कणकवलीत झालेल्या ठाकरे सेनेच्या होऊ द्या चर्चा कार्यक्रमात एकाही वक्त्याने आमदार नितेश राणेंच्या विकासकामांबद्दल भाजपाच्या बॅनर चा उल्लेख न करता आपले मुद्दे त्वेषाने मांडणे अपेक्षित होते. परंतु ज्यांच्या आश्वासनांची पोलखोल करायला होऊ द्या चर्चा कार्यक्रमाचा हा घाट घातला होता त्यांच्याच भाजपा आमदार नितेश राणेंनी केलेल्या 2 हजार 200 कोटींहून अधिक निधींच्या विकासकामांचा नकळत उल्लेख स्वतःच्याच तोंडून करून आपण विरोधी पक्षाच्या आमदाराने केलेल्या विकासकामांचा प्रचार करतोय ह्याचे भान ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना कणकवलीतील होऊ द्या चर्चा कार्यक्रमात राहिले नाही हे विशेष होय. एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटतेय, पोईप मध्ये आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या होऊ द्या चर्चा कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला. लोकशाही मध्ये आपले मुद्दे मांडण्याचा आपली भूमिका व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. विरोधी पक्ष म्हणून ठाकरे सेनेने होऊ द्या चर्चा कार्यक्रमातून सत्ताधाऱ्यांना जाब विचारला. हा जाब विचारणे असह्य झाल्यानेच भाजपा पदाधिकाऱ्यांनी पोईप मध्ये ठाकरे सेनेच्या होऊ द्या चर्चा कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा केलेल्या प्रयत्नातून प्रकर्षाने जाणवले.आणि त्याचा फायदा हा नकळत ठाकरे सेनेला झाला.पोईप मधील कार्यक्रमाची चर्चा मालवण तालुक्यात होणे हे ठाकरे सेनेला अपेक्षित असताना केवळ भाजपा पदाधिकाऱ्यांनी अतिउत्साहात ठाकरे सेनेच्या कार्यक्रमस्थळी जाऊन केलेल्या कृत्यामुळे शिवसेना उबाठा च्या पोईप मधील होऊ द्या चर्चा ह्या कार्यक्रमाची कर्णोपकर्णी झाली.मालवण तालुक्यासह केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्हे तर राज्यभरात झाली. या घटनेचा बोध घेत कणकवली भाजपा पदाधिकाऱ्यांनी चाणाक्षपणे एक अवाक्षर न बोलता नितेश राणेंच्या विकासकामांचा बॅनर शिवसेना उबाठा च्या होऊ द्या चर्चा कार्यक्रमस्थळी लावला आणि ठाकरे सेनेच्या वक्त्यांनी त्याच बॅनरवर टीकाटिप्पणी केली.या टिकेतूनही चर्चा झाली ती नितेश राणेंनी केलेल्या 2 हजार 200 कोटींहून अधिक निधींच्या विकासकामांची.

error: Content is protected !!