घोणसरी ग्रा.पं. च्या माध्यमातून वाचनालय वाचकांच्या सेवेत दाखल
फोंडाघाट (प्रतिनिधी) : घोणसरी ग्रामपंचायत च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन हेमंत राणे व नंदकुमार सावंत यांच्या उपस्थितीत नुकतेच पार पडले.
गावातील प्रत्येक विद्यार्थ्यापासून अबालवृद्धापर्यंतच्या लोकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी पंधरावा वित्त आयोगातील निधी खर्च करून गावामध्ये वाचनालय सुरू करण्याचा स्तुत्य निर्णय सरपंच मॅक्सी पिंटो यांनी घेतला होता. त्या निर्णयाला सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी होकार दर्शवत या सूज्ञ उपक्रमास सहमती दर्शवली. वाचनालयासाठी लागणारे फर्निचर हेमंत राणे व नंदकुमार सावंत यांनी दिले.
उपस्थितांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत ग्रंथभेट देण्याचा संकल्प यावेळी केला.अशा पद्धतींने ग्रंथसंपदा वाढवत वाढवत गावातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा साठी उपयोगी पडणारी पुस्तके सुद्धा उपलब्ध करून देणार असून आपल्या गावातील विदयार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये जास्तीत जास्त यश कसे संपादन करतील याबाबत दक्ष राहणार असल्याचे मनोगत सरपंच मॅक्सी पिंटो यांनी व्यक्त केले.
हल्लीच्या पिढीच्या हातात मोबाईल ऐवजी पुस्तके पडलीत तर देशाचा विकास आणखीन जोरात होईल. त्यामुळे आज सुरु केलेल्या या वाचनालयाचा लवकरच वटवृक्ष होईल व अनेक चांगले नागरिक निर्माण होण्यास हातभार लागेल अशी आशा हेमंत राणे यांनी व्यक्त केली.
यावेळी माजी सरपंच मृणाल पारकर, उपसरपंच दीप्ती कारेकर,समीर राणे,दत्ताराम गुरव,माजी सरपंच एकावडे,अनंत गुरव, पोलीस पाटील संतोष एकावडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटीचे चेअरमन दीपक राणे, भाई राणे,विलास मराठे,शाळांचे मुख्याध्यापक तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक सिद्धेश गोसावी यांनी केले. सुत्रसंचालन व आभार विद्याधर पाटील यांनी केले.












