कणकवली (प्रतिनिधी) : इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स कळसुली या प्रशालेमध्ये इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र पोलीस आणि MKCL यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सिक्युरिटी या विषयांवर मुलांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमांसाठी उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये कणकवलीचे पोलीस उपनिरीक्षक विनायक चव्हाण, कणकवली पं.स.गटशिक्षणाधिकारी किशोर गवस , हेड कॉन्स्टेबल श्री.कोलते, मुख्याध्यापक व्ही.व्ही.वगरे, ज्येष्ठ शिक्षक श्री.सावळ आणि शिक्षकवृंद उपस्थित होते.
यावेळी दुर्गाराम इन्स्टिट्यूटचे प्रवीण नाईक यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षितता या विषयावर प्रश्नावली दिली. यामधून तालुक्यातून प्रथम तीन क्रमांक काढून त्यांना पारितोषिक देण्याचे जाहीर करण्यात आले. प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापक श्री. व्ही.व्ही. वगरे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. आणि सायबर सुरक्षितता या विषयाचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.
गटशिक्षणाधिकारी किशोर गवस यांनी मुलांना सायबर सुरक्षिततेच्या ज्ञानाचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांमध्ये त्याबाबत सजगता असणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.
सायबर सुरक्षितता अंतर्गत मार्गदर्शन करतांना विनायक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षितते संदर्भात माहिती दिली.आपली माहिती उदाहरणार्थ बँक डिटेल, पॅन कार्ड,आधार कार्ड, आपले महत्त्वाचे पासवर्ड इत्यादी गोपनीय माहिती कोणासमोरही उघड करू नये. तसेच सोशल मिडियावर आपण सगळ्याच गोष्टी अपडेट करून त्याचा प्रसार करू नये कारण गेल्या काही वर्षांमध्ये सायबर क्राईम मध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली व त्याचे स्वरूपही गंभीर झाले आहे. यासाठी आवश्यक ती खबरदारी घेऊन योग्य त्या उपाययोजना करणे,आपली ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ पोलीस किंवा संबंधित अधिकाऱ्यांना जाणीव करून देणे, मुलांना मोबाईल अतीवापर, ऑनलाइन गेमचे दुष्परिणाम इत्यादी विविध विषयांची सांगोपांग माहिती या चर्चासत्रातून करून देण्यात आली.
या कार्यक्रमात उपस्थितांचे आभार ज्येष्ठ शिक्षक एस.के.सावळ मानले.












