आईचे बोल त्यांना आता ऐकायला येणार !

कोल्हापुरात ‘तरंग’ मधून 20 मुलांवर मोफत कॉकलियर इनप्लांट शस्त्रक्रिया होणार: दोन यशस्वी शस्त्रक्रिया

डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनचा पुढाकार, ऍस्टर-आधारची साथ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जन्मताच मुलाला ऐकू येत नसल्याचं पाहून आई-वडिलांचे मन सुन्न होतं… माझं बाळ कधी ऐकेल याचे उत्तर समोर नसतं…मात्र अशाच बालकांच्या जीवनात एक आशेचा किरण निर्माण केला आहे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांनी. कॉकलियर इनप्लांटच्या माध्यमातून बहिऱ्या मुलांना आता ऐकू येणार आहे. अस्टर-आधार हॉस्पिटलमध्ये अशा मुलांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली जात आहे. नुकत्याच साताऱ्याच्या दोन मुलांवर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे आईचा सर्व संवाद लवकरच त्यांना ऐकू येणार आहे.

घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आणि बेताची असल्याने जगणेही अनेकांसमोर कठीण असते, अशातच नियतीने मुलाला ऐकावयास दिले नाही तर पालकांसमोर दुःखाचा मोठा डोंगर उभा राहतो. आयुष्य कोणासाठी आणि कशासाठी जगायचे हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहतो. ‘कॉकलियर इनप्लांट’ एकमेव पर्याय त्यांच्या समोर असतो, मात्र यासाठी आठ ते दहा लाख रुपये खर्च येत असल्याने गरिबांना परवडणारे नसते. यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष, अस्टर आधार हॉस्पिटल यांनी पुढाकार घेतल्याने अनेक बालकांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे राज्याचे प्रमुख मंगेश चिवटे, कोल्हापूर जिल्ह्याचे समन्वयक प्रशांत साळुंखे, अस्टर-आधार हॉस्पिटलचे सीईओ भारत शहा, जनसंपर्क अधिकारी रवींद्र पाटील यांनी ‘तरंग’ ही योजना आखली आणि आणि कुटुंबांच्या जीवनात त्यांनी हास्य फुलवले. नुकतेच सातारच्या दोन कुटुंबाला मुख्यमंत्री वैद्यकीय मदतीचे पत्र प्रशांत साळुंखे यांनी दिले. यावेळी रवींद्र पाटील, करवीर तालुकाप्रमुख मोहन खोत, राजेंद्र पवार, श्रेयश भंडारी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!