दोडामार्ग तत्कालीन तहसीलदारांना शिवीगाळ व वादविवाद प्रकरण
ओरोस (प्रतिनिधी) : दोडामार्ग तत्कालीन तहसीलदार तथा निवडणुक नायब तहसीलदार संजय दत्ताराम कर्पे यांना शिवीगाळ करीत वादविवाद केल्या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी तसेच सुभाष उर्फ बबलू पांगम यांना न्यायालयाने दोषी ठरविले असून दोघांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड सुनावला आहे.
दोडामार्ग तत्कालीन तहसीलदार तथा निवडणुक नायब तहसीलदार संजय दत्ताराम कर्पे हे 16 डिसेंबर 2018 रोजी त्यांच्या शासकीय दालनामध्ये कुडासे गावातील उपोषणाबाबत इतर अधिकारी यांचेशी चर्चा करीत असताना आरोपी बाबुराव दत्ताराम धुरी, वय- 45 रा. भिकेकोनाळ, सुभाष ऊर्फ बबलु सुरेश पांगम, वय -40 रा. आयी यांनी त्यांची कोणतीही परवानगी न घेता शासकीय दालनात प्रवेश केला व दोन्ही आरोपींनी नायब तहसीलदार कर्पे यांच्याशी वादविवाद, शिवीगाळी करुन तुम्हाला बघुन घेतो अशी धमकी देवुन शासकीय कामात अडथळा आणला होता. त्याबाबत नायब तहसीलदार कर्पे यांनी 18 डिसेंबर 2018 रोजी दिलेल्या तक्रारी वरुन दोडामार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
या गुन्हयाचा तपास हा तत्कालीन तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ देसाई यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले होते. या केसची सुनावणी जिल्हा न्यायाधीश -2 व सहाय्यक सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग व्ही. एस. देशमुख यांच्या न्यायालयासमोर झाली. त्यामध्ये वरील दोन्ही आरोपींना शासकीय अधिकाऱ्यास शिवीगाळी केल्याप्रकरणी भा.दं.वि कलम 504 अंतर्गत दोषी धरुन प्रत्येकी पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावलेली आहे. या खटल्याचे न्यायालयातील कामकाज जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड संदीप राणे यांनी पाहिले आहे












