समन्वय समितीचा भव्य मोर्चा यशस्वी, NPS आणि बोनसवर सकारात्मक निर्णय
खारेपाटण (प्रतिनिधी) : बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कामगार-कर्मचाऱ्यांचा ६२३९.०८ कोटी रुपयांचा निधी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) वर्ग करण्याचा घेतलेला निर्णय आणि दिवाळी बोनसच्या मागणीसाठी समन्वय समितीने महापालिका मुख्यालय,आझाद मैदान येथे काढलेला भव्य मोर्चा यशस्वी झाला आहे. महापालिका प्रशासनाने डीसी- १ कर्मचाऱ्यांचे १० टक्के आणि पालिकेचे १४ टक्के प्रमाणे अंशदायी निवृत्ती योजनेत कापलेला ६,२३९.०८ कोटींचा निधी NPS मध्ये वर्ग करण्याचा ठराव क्र.१८९ दि. १५ सप्टेंबर रोजी स्थायी समितीत मंजूर केला होता. हा ठराव दि.२३ ऑक्टोबर च्या महासभेत विषय क्र.२० अन्वये येणार होता. हा ठराव स्थगित करावा आणि जुनी पेन्शन योजना लागू करावी, तसेच दिवाळीपूर्वी वाढीव बोनस मिळावा या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित केला होता.
मोर्चाच्या शिष्टमंडळाने सभागृह नेते श्री. गणेश खणकर, महापौर श्रीम.रितु तावडे आणि विरोधी पक्ष नेत्या श्रीम. किशोरी ताई पेडणेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.यावेळी सकारात्मक चर्चा झाली. NPS चा प्रस्ताव Uआजच्या सभेत घेतला जाणार नाही, तो ‘नॉट टेकन’ म्हणून घेतला जाईल आणि दिवाळी बोनस देण्याची महापालिकेची परंपरा कायम ठेवत गेल्या वर्षीपेक्षा जास्त बोनस लवकरात लवकर जाहीर केला जाईल, असे आश्वासन तिन्ही नेत्यांनी दिले. समन्वय समितीने किमान ५०,००० रुपये बोनसची मागणी केली आहे. दोन्ही मागण्या मान्य झाल्याने आंदोलन यशस्वी झाल्याचे समितीने जाहीर केले आहे.












