फोंडाघाटसह पंचक्रोशीमध्ये परतीच्या पावसाचे धुमशान; दीड तास संततधार

ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट अन् वीज गायब; वनराई बंधाऱ्यांतील जलसाठा वाढण्यास मदत

कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाटसह पंचक्रोशीत परतीच्या पावसाने शुक्रवार 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी जोरदार हजेरी लावत नागरिकांची तारांबळ उडवली. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह सुमारे दीड तास संततधार पाऊस कोसळल्याने परिसरात पावसाचे धुमशान पाहायला मिळाले. वाढत्या उष्म्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला; मात्र पावसाच्या जोरदार सरींसोबतच वीजपुरवठाही खंडित झाल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.

गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या उष्म्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. अशातच अचानक आलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला. ढगांच्या गडगडाटासह विजांचा कडकडाट होत असल्याने पावसाचा जोर अधिकच जाणवत होता. दीड तास सुरू असलेल्या या पावसामुळे नदी, नाले आणि ओहोळांमधील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.

यंदा पावसाने घेतलेली ओढ आणि कोरड्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या पावसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. फोंडाघाट पंचक्रोशीतील विविध भागांत पाणी अडविण्यासाठी बांधण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्यांमध्ये या पावसामुळे जलसाठा वाढण्यास मदत होणार आहे. परिणामी पावसाचे पाणी जमिनीत मुरून भूजलपातळी वाढण्यास हातभार लागू शकतो. त्यामुळे पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करणाऱ्या परिसरासाठी हा पाऊस दिलासादायक ठरण्याची शक्यता आहे.

एकीकडे उष्म्यापासून सुटका आणि दुसरीकडे जलसंधारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारा हा पाऊस फोंडाघाट पंचक्रोशीसाठी दिलासादायक ठरला आहे. मात्र, विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा आणि संभाव्य गैरसोयी याकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!