प्रदर्शन 12 व 13 डिसेंबर, दाेन दिवस चालणार ; विद्यार्थी व शाळांनी सहभागी हाेण्याचे आवाहन
तळेरे (प्रतिनिधी) : येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कणकवली तालुकास्तरीय 51 वे विज्ञान प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन 12 व 13 डिसेंबर 2023 असे दोन दिवस चालणार आहे. या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थी व शाळांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व कणकवली पंचायत समिती आयोजित कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी 10.30 वा.आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी अरुण चव्हाण असून यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, शाळा समिती अध्यक्ष अरविंद महाडिक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मंगळवारी (ता. 12) सकाळी 9.15 वा. नोंदणी करण्यात येईल. त्यानंतर प्रतिकृती मांडणी होईल. 10.30 वा. मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होईल. त्यानंतर 11 वा. प्राथमिक व माध्यमिक गटातील निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा होईल. दु. 1 वा. पासून प्रतिकृती परीक्षण करण्यात येईल.
त्यानंतर बुधवारी (. 13) सकाळी 10.30 वा. प्राथमिक व माध्यमिक गटात प्रश्नमंजुषा स्पर्धा होईल. त्यानंतर दुपारी 3.30 वा. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येईल. या संपूर्ण कार्यक्रमाला शाळा, विद्यार्थी व शिक्षकांनी सहभागी व्हावे असे आवाहन कणकवली गटशिक्षणाधिकारी किशोर गवस व तळेरे विद्यालय प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी केले आहे.










