आमदार वैभव नाईक यांनी अधिवेशनात आवाज उठवताच विधानसभा अध्यक्षांचे निर्देश
नागपूर (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गातील अवैधरित्या होणारी पर्ससीन व एलईडीच्या मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सातत्याने आंदोलने करूनही पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे अवैध मासेमारीवर शासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी आज हिवाळी अधिवेशनात केली. दरम्यान गेल्या तीन अधिवेशनांमध्ये या प्रश्नावर सातत्याने चर्चा झाली आहे. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झालेली दिला. पर्ससीन व एलईडीची मासेमारी रोखण्यासाठी या अधिवेशन काळातच कार्यवाही करावी असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शासनास दिले आहेत.
नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्गच्या सागरी हद्दीत सुरु असलेल्या अवैध पर्ससीन व एलईडीच्या मासेमारीमुळे स्थानिक पारंपरिक मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत गेली काही वर्षे सातत्याने पारंपरिक मच्छीमार अवैधरित्या होणाऱ्या पर्ससीन व एलईडीच्या मासेमारीवर कारवाई व्हावी यासाठी आंदोलने करत आहेत. मात्र अद्यापही शासनाकडून अवैधरित्या होणारी मासेमारी रोखण्यासाठी कारवाई झालेली नाही. मच्छीमारांनी अनेक आंदोलने छेडली मात्र अद्यापही त्यांना न्याय मिळालेला नाही तरी अवैध पर्ससीन व एलईडीच्या मासेमारीवर शासनाने कडक कारवाई करावी त्याचबरोबरर पारंपरिक मच्छीमारांवर जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते मागे घेण्यात यावेत अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी केली.
यावर बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार नाईक यांनी उपस्थित केलेला प्रश्न योग्य असून सिंधुदुर्गात अवैधरित्या सुरु असलेल्या पर्ससीन व एलईडीच्या मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गेल्या तीन अधिवेशनात याबाबत सातत्याने चर्चा झाली आहे. मात्र त्यावरील कारवाई अद्यापही झालेली नाही. त्यामुळे या अवैधरीत्या होणाऱ्या पर्ससीन व एलईडीच्या मासेमारीवर कारवाई करण्यात यावी असे निर्देश त्यांनी शासनास दिले.