कणकवली (प्रतिनिधी): लोरे हेळेवाडी केंद्रस्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात लोरे मांजलकरवाडी शाळेच्या क्रीडांगणावर संपन्न झाला. क्रीडा स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देतात. शारीरिक विकासाबरोबरच मानसिक विकास तसेच बौद्धिक विकास घडून येण्याची प्रक्रिया या स्पर्धेमध्ये होत असते. आजकाल मुलांचा बराचसा वेळ मोबाईल वरील गेम खेळण्यात जातो. त्याचा परिणाम मुलांच्या दृष्टीवर विपरीत होतो तसेच मानसिक दृष्ट्या मुले असदृढ बनतात. परंतु शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या या क्रीडा स्पर्धांकडे विद्यार्थ्यांनी जागरूकतेने लक्ष देणं गरजेचं आहे. उत्तम खेळामुळे उत्तम आरोग्य जपले जाते. तसेच उत्तम स्पर्धक घडवणाऱ्या शिक्षकांचा आम्हाला अभिमान वाटतो,असे प्रतिपादन स्पर्धेचे उद्घाटक लोरे नं.२ गावचे सरपंच विलास नावळे यांनी केले. यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर माजी जिल्हा परिषद सदस्या पल्लवी झिम्माळ, गडमठ गावच्या सरपंच मालती शेटे, आचिर्णे गावचे सरपंच रुपेश रावराणे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा व शिक्षकांना प्रेरणा दिली. यावेळी ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल केंद्राच्यावतीने सरपंच व सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी उपसरपंच रुपेश पाचकुडे,सर्व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख गौतम तांबे,सूत्रसंचालन वैभव तळेकर,आभार सुहास कदम यांनी मानले.
क्रीडामहोत्सवातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास – विलास नावळे












