20 टक्के व्याजाने खेळण्यासाठी दिली जाते ऍडव्हान्स रक्कम
युवा पिढी ठरतेय अवैध धंद्याची बळी
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात ऑनलाईन जुगाराचे पेवच फुटले असून पदरमोड करून खेळण्याऐवजी 20 टक्के व्याजाने जुगार खेळण्यासाठी रक्कम एजंटांकडून दिली जात आहे.जुगार खेळण्यासाठी व्याजाने घेतलेल्या ऍडव्हान्स रक्कम परतफेडीसाठी प्रतिदिन 200 रु हफ्ता ठरवून दिला जातो. जुगारात हरलेल्या रक्कमेच्या वसुलीला एजंटांकडून पठाणी पद्धतीचा तगादा लावला जात असून प्रसंगी देय रक्कमेच्या वसुलीसाठी तारण म्हणून गाडी, सोने, मोबाईल आदी वस्तू जबरदस्ती ने घेतल्या जात आहेत. झटपट मिळणाऱ्या पैशाच्या मोहात कणकवली शहरातील अगदी तरुण मुलेही या ऑनलाईन जुगाराच्या नादी लागून बरबाद होत आहेत. एजंटना मिळणारे तगडे कमिशन असल्यामुळे हा बेकायदा धंदाही जोरात असून त्याने गुन्हेगारी प्रवृत्तीही वाढीस लागत आहे.पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देत योग्य कारवाई करण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे.












