डोक्यात सोडा वॉटर व दारूची बाटली फोडून केला खून

मोबाईल न दिल्याच्या रागातून मित्रानेच मित्राला संपवले

कोल्हापूर (प्रतिनिधी): मोबाईल दिला नाही म्हणून रागाच्या भरात मित्राने डोक्यात सोडा वाटर व दारूची बाटली फोडून खून केला. कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील लोखंडी पुलाखाली सोमवारी रात्री ही घटना घडली. मोबाईल मागण्यावरून दोन मित्रात वाद झाला. यावेळी रागाच्या भरात एकाने दारु व सोड्याची बाटली डोक्यात मारून दुसऱ्याचा खून केला. विनायक विशाल लोंढे (वय ३२, रा. सदर बाजार, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी संशयीत हल्लेखोर समीर युनूस मणेर (वय ३२, मूळ रा. कदमवाडी, सध्या रा. विक्रमनगर, कोल्हापूर) याला शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. आई-वडिलांचे निधन झाल्यामुळे विनायक लोंढे हा एकटाच आहे. त्याच्यावर दुचाकी चोरीचा गुन्हाही दाखल आहे. मिळेल ते काम, विनायक मोलमजुरीचे काम करून उदनिर्वाह करीत होता. त्याचा भाऊ पुण्यात नोकरीला आहे. विशाल सोमवारी रात्री मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील पादचारी उड्डाणपुलाजवळ असलेल्या एका सोडा वॉटरच्या गाडीजवळ थांबला होता. यावेळी तेथे त्याचा मित्र समीर मणेर याच्यासोबत मद्यप्राशन केले. मोबाईल मागण्यावरून दोघांत शाब्दीक वाद झाला, त्यानंतर एकमेकांना त्यांनी चपराक मारली. याच वादातून दोघांमध्ये झटापट झाली. मणेर याने विशालच्या डोक्यात सोडा व दारूच्या बाटल्या मारल्याने तो खाली कोसळला. दोघा मित्रांमधील ही भांडणे सोडवण्यासाठी रिक्षाचालक जावेद अजीज मणेर (रा. कदमवाडी) तेथे गेला,यावेळी विशाल रक्तबंबाळ झाला होता. रुग्णवाहिकेतून लोंढे याला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. खून झाल्याचे समजल्यावर पोलीस निरीक्षक अजयकुमार सिंदकर हे घटनास्थळी व सीपीआर रुग्णालयात आले. पोलिसांनी तातडीने हल्लेखोर मणेर याला ताब्यात घेतले. दारूच्या नशेत झालेल्या वादातून लोंढे याचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. रात्री उशिरापर्यंत शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंद करण्याचे काम सुरू होते.

error: Content is protected !!