युवासेना कुडाळ तालुका समन्वयक योगेश तावडे यांचा दणका ; वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन नरमले

आता वैद्यकीय महाविद्यालयात रत्नागिरी सुरक्षा रक्षक मंडळामार्फतच सुरक्षा रक्षक घेणार

कुडाळ (प्रतिनिधी) : स्थानिक तरुणांना न्याय मिळावा, त्यांना रोजगार मिळावा यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रत्नागिरी सुरक्षा रक्षक मंडळाकडून सुरक्षा रक्षक न घेतल्यास आंदोलन करण्याच्या  शिवसेना युवासेना(उ.बा.ठा.) कुडाळ तालुका समन्वयक योगेश तावडे यांच्या इशाऱ्यानंतर वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता यांनी नरमती भूमिका घेत वैद्यकीय महाविद्यालयात सुरक्षा रक्षक महामंडळ ऐवजी रत्नागिरी सुरक्षा रक्षक मंडळाकडूनच सुरक्षा घेण्यात यावे अशी मागणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ सुनीता रामानंद यांनी वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडे केली आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदुर्ग साठी लागणारे सुरक्षा रक्षक रत्नागिरी सुरक्षा रक्षक मंडळाकडून घेण्यात आले आहे. असे ३६ सुरक्षा रक्षक सद्या कार्यरत आहेत. तसेच या महाविद्यालयासाठी अजून सुरक्षा रक्षकांची आवश्यकता आहे. मात्र नव्याने लागणारे सुरक्षा रक्षक हे रत्नागिरी सुरक्षा रक्षक मंडळामार्फत न घेता ते सुरक्षा रक्षक महामंडळामार्फत घेण्याची प्रक्रिया वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. सुनिता रामानंद यांनी सुरू केली होती. तसेच रत्नागिरी सुरक्षा रक्षक मंडळाकडून सुरक्षा रक्षक घेतल्यास शासनाचे १७ लाख रुपये वार्षिक बचत होणार आहे. मात्र हेच सुरक्षा रक्षक सुरक्षा रक्षक महामंडळामार्फत घेतल्यास जादा १७ लाख रुपये खर्च होणार होते. तसेच स्थानिक सुरक्षा रक्षक यांच्यावर अन्याय देखील होणार आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षक महामंडळाकडून सुरक्षा रक्षक घेण्यास उबाठाचे कुडाळ युवासेना तालुका समन्वय व ओरोस ग्रामपंचायत सदस्य योगेश तावडे यांनी कडाडून विरोध केला असून या ठिकाणी सुरक्षा रक्षक मंडळाकडून स्थानिक सुरक्षा रक्षक घ्यावे अशी मागणी करत तसे न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी अधिष्ठाता यांना दिला होता. योगेश तावडे यांच्या आंदोलनाच्या ईशाऱ्या नंतर वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता यांनी सुरक्षा रक्षक महामंडळाकडून सुरक्षा रक्षक घेण्याची मानसिकता बदलली असून वैद्यकीय महाविद्यालयात सुरक्षा रक्षक महामंडळ ऐवजी रत्नागिरी सुरक्षा रक्षक मंडळाकडूनच सुरक्षा घेण्यात यावे अशी मागणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ सुनीता रामानंद यांनी वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडे केली आहे. तसे पत्रही युवासेनेचे कुडाळ तालुका समन्वयक योगेश तावडे यांना देण्यात आले आहे.

error: Content is protected !!