कोल्हापूर (प्रतिनिधी) : आरोग्यमंत्री तानाजी सावंत कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. अंबाबाईचे दर्शन झाल्यानंतर पुढे दर्शनासाठी जोतिबा डोंगराकडे गाड्यांचा ताफा रवाना झाला. पंचगंगा पूल गाड्यांनी ओलांडला. रविवार आणि नाताळची सुट्टी असल्याने पन्हाळा मार्गावर पर्यटकांच्या वाहनांची संख्या मोठी होती. यातून वाट काढत ताफा ज्योतिबा डोंगराकडे जात होता. पोलिसांची पायलट आणि तालुका पोलिसांची गाडी पुढे होती… त्याच्यामागे मंत्री महोदयांची गाडी होती… आणि त्याच्या मागे मंत्री महोदय यांचे पीए रविराज जाधव, रवींद्र अनभुले आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रशांत साळुंखे इनोवा गाडीतून मार्गस्थ होते. वडणगे गावचा फाटा सोडल्यानंतर वाहने हळू पुढे जात होती. पुढे रजपुतवाडी जवळ पुढील दोन पोलीस वाहने आणि मंत्री महोदय यांची गाडी हळुवार पुढे जात थांबली आणि मागील इनोव्हा गाडीची अचानक जोरदार धडक बसली. जोरदार धडक बसल्याने मागील इनोव्हाचा रेडिएटर फुटला आणि धूर सर्वत्र पसरला. काही काळ समजेना काय होत आहे. जोरदार धडकमुळे पीए रविराज जाधव, प्रशांत साळुंखे यांना पायाला दुखापत झाली. पुढे मंत्री तानाजी सावंत यांना जोरदार जर्क बसला. तातडीने गाडीतून उतरून प्रशांत साळुंखे यांनी मंत्री तानाजी सावंत यांना दुसऱ्या गाडीत बसून ज्योतिबा मंदिरकडे मार्गस्थ केलं. यावेळी साळुंखे यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांना तात्काळ माहिती दिली. दोन्हीही अपघाती गाड्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान मंत्री तानाजी सावंत हे सुखरूप असून मुंबईकडे रवाना ते रवाना झाले.
आरोग्य मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांच्या अपघाताने खळबळ












