खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई येथील चिंचपोकळी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने जीवन आनंद संस्थेच्या समर्थ आश्रमला नुकतेच वाँलफँन आणि जीवनावश्यक वस्तूंचे सहाय्य करण्यात आले. मंडळाचे प्रतिनिधी अतुल केरकर, मंदार आमकर, अमित हडकर, राजु नारकर, रोनित पारकर या प्रमुख पदाधिकारी यांनी नुकतीच समर्थ आश्रमला भेट देवून जीवनावश्यक वस्तू आश्रमास सुपूर्द केल्या.
चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ गेली १०४ वर्षे चिंचपोकळी रेल्वे स्टेशन लगत गणेशाशोत्सव, नवरात्र उत्सव ,शिवजयंती,लोकमान्य टिळक पुण्यतिथी हे सार्वजनिक कार्यक्रम राबवित आहे.याचबरोबर मंडळाच्या माध्यमातून आरोग्य केंद्र, किलबिल नर्सरी, अभ्यासिका, ग्रंथालय, वाचनालय या सारखे लोकोपयोगी व सामाजिक उपक्रम चालविण्यात येत असून समाजातील निराधार, वंचितांसाठी कार्य करणा-या स्वयंसेवी संस्थाना मोलाचे सहाय्य देखील या मंडळाच्या वतीने करण्यात येते. याच कार्याअंतर्गत समर्थ आश्रमास ५ वाँलफँन आणि जीवनावश्यक किराणा साहित्याचे योगदान नुकतेच देण्यात आले.
जीवन आनंद संस्था संचलित विरारफाटा वरठापाडा ता.वसई येथील समर्थ आश्रमात रस्त्यावरील निराधार वंचित बांधवांची सेवाशुश्रृषा केली जाते. संस्थेचे संस्थापक संदिप परब यांनी हाती कोणतीही संसाधने नसताना ११ वर्षांपुर्वी मुंबईतील वाकोला पुलाखाली निराधार जख्मी आजारी बांधवांची सेवा करीत असताना सहकारींसह जीवन आनंद संस्थेची उभारणी केली. आज संस्थेचे रस्त्यावरील निराधार वंचितांचे पुनर्वसनासाठी मुंबई, पालघर, सिंधुदुर्गसह गोवा राज्यात आश्रम,शेल्टर होम आणि पदपथावरील वंचित बालकांसाठी मुंबईतील सांताक्रुज व दहिसर येथे डे केअर सेंटर चालविण्यात येत आहेत. जीवन आनंद संस्थेच्या टिममधील किसन चौरे व भाईदास माळी यांनी चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे मनःपुर्वक आभार मानले.दिपाली मेघा -माळी व चंदा क्षेत्री यावेळी उपस्थीत होते.