ओरोस (प्रतिनिधी) : कोणतीही साहित्यकृती ही सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सार्वजनिक जीवनाची मूल्यं सांभाळून जन्माला येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान दिले. या संविधानात सामाजिक प्रबोधनाची मूल्यं आहेतच, त्याचप्रमाणे स्वातंत्र्य, समता, बंधूता आणि न्याय ही सुध्दा मूल्ये प्रावर्धित करण्यात आली आहेत. ती प्रत्येक भारतीयांसाठी स्वाभिमान निर्माण करणारी आहेत जी ‘डाझाइन अॅन्ड इट्स शेंडो’ या ग्रंथामध्ये त्या ग्रंथाचे लेखक बळीराम लाडू कदम यांनी अंतर्भूत केलेली आहेत. त्यामुळे हा ग्रंथ सामाजिक क्रांतीसाठी, प्रबोधनासाठी मार्गदर्शक ठरणारा आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक डॉ. सोमनाथ कदम यांनी केले. ते ओरोस येथे बळीराम लाडू कदम यांच्या ‘डाझाइन अँन्ड इट्स शॅडो’ या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. ते पुढे म्हणाले की कोणत्याही ग्रंथाची निर्मिती ही सामाजिक मूल्यांची दखल घेऊनच झाली पाहिजे. बळीराम कदम यांनी हा ग्रंथ स्वतःचे आत्मकथन म्हणून न करता सामाजिक क्रांतीसाठी आवश्यक असलेले सर्वांगिण गुणात्मक मूलतत्वे यांचा त्यात अंतर्भाव केला आहे. त्यामुळे हा ग्रंथ सर्व सामाजिक घटकांनी आवर्जून वाचावा असे आव्हानही त्यांनी केले. यावेळी बळीराम कदम यांचे विद्यालयीन मार्गदर्शक सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगांव बुद्रुकचे निवृत्त मुख्याध्यापक छाया सावंत, पाटील मॅडम, चुबे सर,कदम सर, वळंजू सर हेही उपस्थित होते. तसेच डी. केपडेलकर,अनंत कदम यांनीही आपलं मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमास भारतीय बौध्द महासभा सिंधुदुर्गचे माजी अध्यक्ष आद. भिकाजी वर्देकर, मुंबईचे रांगोळी चित्रकार वर्दे गावचे सुपुत्र आद. कृष्णा वर्देकर या कार्यक्रमास मुंबईतून उपस्थित राहीले होते.भा. बौ.महासभा सिंधुदुर्गचे अध्यक्ष आद.विश्वनाथ कदम,अपरान्त साहित्य संघ सिंधुदुर्गचे पदाधिकारी राजेश कदम व अनिल जाधव हे हजर होते. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार माधव कदम व मोहन जाधव, सुर्यकांत कदम, प्रमोद कासले, विद्यामंदीर कणकवलीचे शिक्षक संदीप कदम आणि जिल्ह्यातील सामाजिक राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक संघटनेचे, विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तीमत्वे, साहित्यप्रेमी आणि सामाजिक चळवळीतील बळीराम कदम यांचे सर्व मित्रपरिवार त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जुन उपस्थित राहिला. प्राधिकरणातील ज्येष्ठ मंडळी देखिल उपस्थित होती.
सर्व मान्यवरांनी पुस्तकाविषयी विवेचन केले. काहींनी लेखकावर तर काहींनी लेखनावर भाष्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यवान कदम यांनी केले. तर सूत्रसंचालन ज्येष्ठ निवेदक राजेश कदम यांनी केले. आद. पुरुषोत्तम कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले. ग्रंथाचा प्रकाशन सोहळा ओरोस येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारदालनात संपन्न झाला.












