कणकवली (प्रतिनिधी) : शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित विद्यामंदिर, हरकूळखुर्द येथे प्रशालेचा माजी विद्यार्थी कु. सर्वेश वसंत रासम यांची भारतीय सैन्याच्या अग्निवीर पदासाठी निवड झाल्याबद्दल मंगळवार, दि. ३० जून २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता शुभेच्छा व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक होते. यावेळी शालेय समिती सदस्य अनिल सावंत (गुरुजी),संतोष कदम,समीर सावंत तसेच पालक दिपक रासम उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कु. सर्वेश रासम यांचा पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच आपल्या मनोगतातून त्यांच्या यशाचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी शिस्त, परिश्रम, जिद्द आणि देशसेवेची प्रेरणा घेऊन जीवनात उच्च ध्येय गाठावे, असे आवाहन केले.
मुख्याध्यापकांनी आपल्या मनोगतातून कु. सर्वेश रासम यांच्या यशाचा गौरव करत, हे यश संपूर्ण प्रशालेसाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनीही त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन शिक्षणासोबतच देशसेवेची भावना जोपासावी, असे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शाळेतील शिक्षकांनी केले. कु. सर्वेश रासम यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण हरकूळखुर्द परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.












