मुंबई (प्रतिनिधी) : ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदे गटात गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘ऑपरेशन टायगर’ थांबलेले नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. आता ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे.त्यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड करण्यात आली आहे.त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
सचिन अहिर यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेषतः वरळी मतदारसंघातील त्यांच्या प्रभावामुळे हा निर्णय उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.
सचिन अहिर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधून केली होती. ते राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष तसेच राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्रीही राहिले आहेत. वरळी विधानसभा मतदारसंघातून ते दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले.
1999 ते 2019 या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत असलेले अहिर नंतर शिवसेनेत दाखल झाले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता आणि ते त्यांच्या विश्वासू नेत्यांपैकी एक मानले जात होते. मात्र, आता त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्याने बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.












