पर्यटन जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरील स्वागत आणि मानवंदना सदैव सर्वांसाठी प्रेरणादायी – कुमार नाडकर्णी
ग्रामस्थ, कॉलेज, हायस्कूल एनसीसी कॅडेट कडून रणगाड्याला मानवंदना
फोंडाघाट (प्रतिनिधी) : १९६५ मधील भारत- पाक युद्धात अविस्मरणीय कामगिरी करून सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक ठरलेला ऐतिहासिक रणगाडा पुणे (खडकी) येथून बॅ.नाथ पई सेंट्रल स्कूल- कुडाळ यांना देण्यात आला.या रणगाड्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारी,फोंडाघाट मध्ये, एसटी स्टँड येथे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी फोंडाघाट महाविद्यालयाचे एनसीसी कॅडेट आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या एनसीसी विभागाने रणगाड्याला मानवंदना देऊन सोबत असलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत केले. भारत माता की जय ! वंदे मातरम !भारतीय सैनिकांचा विजय असो ! अशा बुलंद आणि जाज्वल घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. त्यांला उपस्थितानी जोरदार साथ दिली. फोंडाघाट ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामस्थ आणि छात्र सेनेच्या वतीने कुमार नाडकर्णी यांनी ऐतिहासिक शिल्प रणगाड्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केले.
यावेळी पर्यटन विकासात भर पाडण्यासाठी सदैव कार्यरत उमेश गाळवणकर,व्यंकटेश भंडारी, शेखर सावंत, यांच्या नेतृत्वाखाली वैशाली गोठवणेकर ,सायलीन वारंग, प्रणाली मयेकर,सुमंत करंगळे,प्रकाश कानडे, संतोष पडते,भाग्यश्री भोगटे,नचिकेत देसाई आणि नाथ पै शाळेचे एनसीसी छात्र सोबत होते. ऐतिहासिक वसा लाभलेल्या या रणगाड्याची शौर्यगाथा लेफ्टनंट डॉक्टर राज ताडेराव यांनी सांगितली. ते म्हणाले,पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांचे काळात भारत-पाक युद्धात जनरल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैनिकांनी केलेल्या पराक्रमाला या रणगाड्याद्वारे अविस्मरणीय साथ दिली होती. फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी, ५८ बटालियन, एनसीसी सिंधुदुर्ग व हायस्कूल एनसीसी विभाग यांचे वतीने या रणगाड्याचे स्वागत करण्यात येत आहे. यावेळी ऑफिसर आर्या भोगले, मारुती लाड, संतोष रायबोले, आयुष सावंत इत्यादी उपस्थित होते.
फोंडाघाट चा इतिहासात एक “अविस्मरणीय क्षण” असा उल्लेख या ऐतिहासिक रणगाड्याचे स्वागत करताना प्रत्येक फोंडावासीयांच्या मनात रुजेल. कारण प्रवेशद्वारावरील स्वागत सदैव प्रेरणादायी आणि भविष्यात ऊर्जा देणारे ठरते. भारतीय सैनिकांची शौर्यगाथा या ऐतिहासिक शिल्पातून नाथ पई हायस्कूल कुडाळ येथे नक्कीच जपली जाईल. पर्यटन विकासासाठी अधोरेखतही होईल. मात्र शौर्याचे पावित्र्य हे सुद्धा तशाच भावनेतून जपले गेले पाहिजे. असे उद्गार स्वागत प्रसंगी बोलताना कुमार नाडकर्णी यांनी नाथ पई स्कूलच्या भाग्याचे कौतुक केले.आणि हा स्वागत सोहळा- फोंडावासीयांकडून, सरपंच, गावातील संस्था आणि ग्रामस्थांच्या वतीने होत असल्याचे आवर्जून सांगितले.त्या स्वागत प्रसंगी बहुसंख्य ग्रामस्थ, अबाल वृद्धांनी उपस्थित राहून गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार झाल्याची भावना व्यक्त केली. त्यानंतर रणगाडा रॅली कणकवली येथे रवाना झाली.













