बुलेटस्वाराला ला ठोकरून पलायन केल्याप्रकरणी रमेश भागवत जाधव वर गुन्हा दाखल

कणकवली (प्रतिनिधी) : धावत्या बुलेटदुचाकीला मागून ठोकरून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी रमेश भागवत जाधव ( रा कातवड,ता.मालवण,जि सिंधुदुर्ग ) यांच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात 22 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर ओसरगाव साईश नर्सरीजवळ घडला होता. याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, कणकवली शहरातील हाॅटेल साेलकरीचे मालक अक्षय बाळकृष्ण पन्हाळकर ( वय 32, रा. कलमठ गावडेवाडी ) हे आपल्या ताब्यातील बुलेट दुचाकीने कणकवली हुन कसालच्या दिशेने जात होते. त्यावेळी मागून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांच्या बुलेट दुचाकीला जोरदार धडक दिली. कारच्या धडकेनंतर कारचालकाने कारसह घटनास्थळावरून पलायन केले होते.या अपघातात अक्षय याना दुखापत होऊन जखमी झाले होते. तर दुचाकीचेही नुकसान झाले होते. वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर अक्षय पन्हाळकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात 25 नोव्हेंबर 2023 रोजी दिलेल्या फिर्यादीनंतर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार मनोज गुरव यांनी अपघाताच्या वेळचे गड नदी वरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता अपघातातील कार ( MH 07 AG – 0826 ) असल्याचे चौकशीअंती दिसून आले. त्यानुसार सदर कार ही टोपीवाला हायस्कुल येथील शिक्षक रमेश भागवत जाधव ( वय 46, रा. कातवड, ता मालवण, जि सिंधुदुर्ग ) यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले.पोलिसांनी रमेश जाधव यांच्याकडे चौकशी केली असता स्वतः रमेश जाधव हे कार चालवत असताना हा अपघात घडल्याचे समोर आले. त्यानुसार रमेश जाधव यांच्यावर आयपीसी कलम 279, 337, मोटरवाहन कायदा कलम 184, 134 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!