फोंडाघाट राधाकृष्ण मंदिरात ” एक दिवा – माझ्या रामाचा ” संकल्पनेतून २०२४ पणत्यांचा दीपोत्सव !

मंदिर प्राकार दीपांनी तेजोमय ! महिलांमध्ये उदंड उत्साह शिगेला

सनईच्या सुरावळीत,जय सियाराम- जय श्रीराम चा जयजयकार आणि फटाक्यांची आतषबाजी !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : देशपातळीवरील अयोध्येतील अभूतपूर्व श्रीराम मंदिराचे लोकार्पण-जन्मोत्सव, सर्वत्र जल्लोषात साजरा होत असताना, संयोजकांच्या आवाहनानुसार, फोंडाघाट मध्ये सोहळ्याची सांगता, २०२४ पणत्यांच्या दीपोत्सवाने,संध्याछायेच्या पूर्वसंध्येवर आणि महिलांच्या उदंड उत्साहात, राधाकृष्ण मंदिर येथे संपन्न झाली. वनवास संपून श्रीराम परत आल्यानंतर,अयोध्यावासियांनी गुड्या -तोरणे उभारून आणि दीपोत्सवाने, विजयोत्सव साजरा केला होता. त्याची प्रचिती आज बालगोपाळ मंडळ आणि महिला भगिनींनी मंदिरातील,सनईच्या सुरावटीमध्ये दीपोत्सव साजरा करून आणून दिली.

स्वस्तिक,धनुष्यबाण,जय श्रीराम, श्रीकृष्ण अशी पणत्यांची सजावट लक्षवेधी होती. मंदिराचा प्राकार दिव्यांच्या तेजोमय प्रकाशात, वातावरण उत्साही – प्रसन्न – सात्विक झाल्याचा अनुभव उपस्थितानी घेतला.

तत्पुर्वी संध्याकाळी फोंडाघाट वारकरी मंडळाचे भजनाने या उपक्रमाची रंगत वाढवली. दीपोत्सवानंतर जय सियाराम, जय श्रीराम, च्या घोषणांनी बाजारपेठ दुमदुमली .त्यानंतर महाआरतीने अन् प्रसाद वाटपाने गेले तीन दिवस उत्साहाने पार पडलेल्या सोहळ्याची सांगता पसायदान- प्रार्थना याने झाली. यावेळी बालगोपाळ मंडळाचे सर्व सदस्य, महिला वर्ग ग्रामस्थ, अबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बाजारपेठेमध्ये सुद्धा व्यावसायिकांनी एक पणती लावून आपला आनंद व्यक्त केला…

error: Content is protected !!