‘ कसरत ‘ कार आत्माराम जाधव काळाच्या पडद्याआड …

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : पूर्वीचा रत्नागिरी जिल्हा आणि त्यानंतर स्वतंत्र निर्माण झालेला सिंधुदुर्ग जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आपल्या शिक्षकी पेशाला न्याय देत अनेक विद्यार्थी घडविणारे प्राथमिक शिक्षक आणि अपग्रेड मुख्याध्यापक म्हणून काम केलेले प्रामाणिक, तळमळीचे शिक्षक म्हणून नाव लौकिक मिळविणारे आत्माराम पुंडलिक जाधव हे आज पहाटे दिर्घ आजाराने काळाच्या पडद्याआड झाले. सुरवातीला भारतीय बौद्ध महासभा या राष्ट्रीय संघटनेचे ते वेंगुर्ला तालुका अध्यक्ष म्हणून काही काळ काम केले. त्यानंतर आपल्या सुविज्ञ पत्नी विनोदिनी हिच्या साथीने त्यांनी आपल्या पाचही मुलांना उच्च शिक्षण देऊन समाजकार्य करण्यास प्रत्साहीत केले होते.आणि सर्व मुले आपला कामधंदा संभाळत समाजाप्रती थोडे बहुत काम करीत आहेत.

कालकथित आत्माराम जाधव यांनी कसरत हे आत्मकथन लिहिले असून त्यांच्या या आत्मकथनाला अस्मितादर्श चा महत्त्वपूर्ण पुरस्कार लाभलेला आहे. या आत्मकथनात, त्यांच्या शिक्षकी पेशात त्यांना आलेल्या अनुभवांची मांडणी प्रत्ययास येते. आदर्श जीवन जगत असताना, त्यांनी आपल्या मुलांवर उत्तम, सम्यक संस्कार केले. त्याचेच फळ म्हणजे – सम्यक साहित्य संसदचे अध्यक्ष, प्रसंवाद या अनियतकालिकाचे संपादक व अपरान्त प्रबोधिनीचे कार्यकारिणी सदस्य, अपरान्त सिंधुदुर्ग शाखेचे कार्याध्यक्ष, इंजि. अनिल जाधव. हे आंबेडकरवादी चळवळीला लाभलेला खंदा कार्यकर्ते आहेत.तसेच जिच्या हातून गाथा बोधिवृक्षाची पानांची या कविता संग्रहाची निर्मिती झाली ती सशक्त कवयित्री मनिषा जाधव.तसेच राय.डॉ.रा.धों.खानोलकर हायस्कूल मठ चे मुख्याध्यापक सुनील ज‍ाधव हे सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक कार्य करीत आहेत. त्यांनी त्यांच्या मुलां-मुलींत भेद न करता उत्तम शिक्षण दिले. त्यांचे सर्वांशी वागणे सौहार्दपूर्णतेचे व आपुलकीचे होते. आयुष्याशी सातत्याने कसरत करणारे व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले आहे. या कसरतकार आत्माराम पुंडलिक जाधव यांना तीन मुली उषा (कालकथित), आशा, मनीषा, मुलगा अनिल, सुनील जावई सुधाकर जाधव (तळवडा), संजय जाधव (वेतोरे)तसेच भाऊ एक नाथ व गंगाराम भावजया, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार लाभला होता. वेंगुर्ला आनंदवाडी व म्हाडा कॉलनी येथे त्यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे.

error: Content is protected !!