कणकवली काॅलेजमधील बी.काॅम.बॅचच्या सन १९९५-९६ च्या माजी विद्यार्थ्यांचे गेट चौथे टुगेदर रंगले वेंगुर्ले – खवणे बीच रिसाॅर्टमध्ये
तळेरे (प्रतिनिधी) : कणकवली काॅलेजमधील सन १९९५-९६ च्या बी.काॅम बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे अर्थातच मैत्री परिवाराचे चौथे गेट टुगेदर निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या वेंगुर्ले – खवणे येथील निसर्गरम्य ब्ल्यु लगून रिसाॅर्टमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले.मैत्री परिवाराचे हे दोन दिवसांचे सलग चौथे गेट टुगेदर चांगलेच अविस्मरणीय ठरले.
मैत्री परिवारातील सर्व मित्रमैत्रिणींना एकत्रित आणून सर्वांना भेटता यावे.रोजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाच्या जीवनात आनंद निर्माण करता यावा.तसेच आनंदाचे क्षण मनसोक्तपणे एकत्रितपणे घालविता यावेत.जेणेकरुन त्यातून जीवनामध्ये नवीन उर्जा मिळेल,उत्साह निर्माण करता व्हावा हीच या मागील संकल्पना आहे.पण म्हणतात ना मैत्रीची ओढ कधी स्वस्थ बसू देत नाही.त्यामुळे सर्व मित्रमैत्रिणींना चौथ्या गेट टूगेदरचे वेध लागले होते आणि मोठ्या संख्येने व उत्साहाने सहभागी झाले होते.
काहींनी कार्यक्रमाच्या नियोजनापासून आयोजनापर्यंत सर्व जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत ती उत्तमपणे पार पाडण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले त्यात प्रामुख्याने महेंद्र सांब्रेकर, संजय खानविलकर,जयराम डामरे, सरिता काणेकर, गीता पाटकर, सुरेखा मेजारी यांनी विशेष मेहनत घेतली. मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर तसेच अन्य ठिकाणाहून व जिल्ह्यातील विविध भागामध्ये नोकरी, धंदा, व्यवसायामध्ये बिझी असणाऱ्या मित्रमैत्रिणी निव्वळ मैत्रीच्या ओढीने एकत्रित झाल्या होत्या. सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित रहावे यासाठी काही मित्र-मैत्रिणींनी सर्वांशी संपर्क साधून मैत्रीसेतू बनण्यासाठी आग्रही भूमिका बजावली. आपल्या मित्र-मैत्रिणींना चांगला दर्जेदार कार्यक्रम देता यावा तसेच सर्वांची राहण्याची जेवणाची आणि येण्या-जाण्याची चांगली व्यवस्था व्हावी यासाठी योग्य नियोजन केले.कार्यक्रम स्थळी राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.विशेषता महिलांसाठी सुरक्षित आणि स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. चहा, नाश्ता, जेवण यामध्येही वैविध्यता ठेवण्यात आली होती.तसेच कणकवली वरुन नियोजित वेंगुर्ले-खवणे याठिकाणी येण्याजाण्यासाठी काही मित्रांनीच आपली चारचाकी वाहनांची सोय उपलब्ध करून दिली.
पहिल्या दिवसाची सुरुवातीला कांदळवन खाडीमध्ये सर्वांना बोटीतून बोटिंगची सैर करण्यात आली. बोटींगमध्ये देखील गाण्याच्या भेंड्यांचा आनंद सर्वांनी घेतला. त्यानंतर श्रीफळ वाढवून आणि सौ.दीपा नारकर हीने शंख नाद करून कार्यक्रमाचे रित्सर उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर गेल्या वर्षभरात ज्या मित्र-मैत्रिणींचे वाढदिवस झाले त्या सर्वांचा एकत्रितपणे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच मैत्री भेट मोगऱ्याच्या पुष्पाच्या रोपाची कुंडी भेट म्हणून देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. योगगुरू दीपा नारकर हीने अप्रतिम असे योगा नृत्य सादर करुन सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. त्यानंतर कराओके मराठी,हिंदी गाण्याची सुरेल मैफिल रंगली होती. मात्र या सगळ्यात कार्यक्रमस्थळी स्टेजवरती लावण्यात आलेला मैत्री परिवाराचा “रक्ता पलिकडचं नातं…मैत्रीचं” हा भला मोठा बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेत होता.त्यानंतर प्रथमच गेट टुगेदर मध्ये सहभागी झालेल्या मित्रमैत्रिणी आपली स्वतःची ओळख,व्यवसाय आणि राहण्याचे ठिकाण याविषयीचा ओळख परेड राऊंड झाला.त्यानंतर महेंद्र सांब्रेकर, जयराम डामरे, बाळू पाताडे, राजेंद्र हिंदळेकर, मंगेश वाळिंबे, संजय राणे, अजय वाळके, गीता पाटकर, सरिता काणेकर, अर्चना मोरजकर यांनी सुंदर गाण्याची पेशकश सादर करुन सर्वाची मने जिंकली.तसेच अर्चना मोरजकर हीने शिट्टीवरती गायलेले सुंदर गाण्याने आपल्यातील वेगळ्या कलेची चुणूक दाखवून दिली.त् यानंतर रात्री कोंबडी-वडे तसेच शाकाहारी जेवणाची व्यवस्था केली होती.
रात्री भोजनानंतरच्या सत्रात खरी रंगत आणली ती मैत्री परिवारातील मित्र अजित लाड, जयराम डामरे, अजय वाळके, संजय सावंत, गंभाजी राणे, मंगेश वाळिंबे, प्रदीप धुरी आणि शंकर गोसावी अप्रतिम दशावतारी नाटक वेशभूषेसह सादर करुन सर्वाचे चांगलेच मनोरंजन केले तसेच त्यांना संगीत साथ दिली ती संतोष दळवी,बाळू पाताडे व अन्य सहकारी यांनी.तसेच रसिक मित्रमैत्रिणींनी बक्षिसे देऊन प्रोत्साहन दिले. सर्वांनी उत्तम प्रतिसाद देत या आनंद सोहळ्याचा मनमुराद आनंद घेतला.
दुसऱ्या दिवसाची सुरुवात गप्पागोष्टी मारत फिरण्याचा आनंद,माॅर्निंग वाॅकने झाली. तसेच योगगुरू दीपा नारकर हीने योगाविषयीचे महत्त्व, आवश्यकता, गरज तसेच योगाच्या माध्यमातून आजार मुक्त शरीर कसे ठेवले पाहिजे याविषयी उत्तम मार्गदर्शन केले. त्याचबरोबर प्रत्यक्षात प्रात्यक्षिके दाखवून सर्वांकडून योगासने करून घेतली. तसेच शंकांचे योग्य निरसन देखील केले. त्यानंतर क्रिकेट,लगोरी,एका काडीत मेणबत्या पेटविणे,संगीत खुर्ची खेळण्याचा आनंद अनेकांनी घेतला. विजेत्यांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. त्यानंतर विचारमंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेकांनी आपल्या चांगल्या सुचना तसेच नवीन संकल्पना मांडल्या. त्यानंतर अनेक विषयांवरती विचारविनिमय करुन पुढील गेट टुगेदर ऐन पन्नाशीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या मित्रमैत्रिणींच्या स्वागतासाठी एक वेगळी थीम तयार करून पुढील दिशा व रुपरेषा ठरविण्यात आली.
दोन दिवस आपल्या रोजच्या व्यापातून व ताण तणावातून मुक्त होत आनंदात,मजेत,धमाल मस्तीत गेल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता.दुसऱ्या दिवशी सायंकाळी सर्वांनाच आपआपल्या घरी परत जाण्यासाठी परतीचे वेध लागले.पुढच्या वर्षी असेच पुन्हा एकदा भेटण्याचा निश्चय करून सर्वजण एकमेकांचा निरोप घेऊन मार्गस्थ झाले. “रक्ता पलिकडचं नातं…मैत्रीचं” असा मैत्रीचा संदेश देणारा हा मैत्री परिवार खरचं सर्व मित्रमैत्रिणींच्या सुख,दु:खात सहभागी होऊन कौटुंबिक नातं जोपासतोय हे विशेष म्हणावे लागेल.
या गेटटूगेदरमध्ये प्रामुख्याने महेंद्र सांब्रेकर,जयराम डांबरे,संजय खानविलकर,शांताराम पाताडे,अजय वाळके,संजय सावंत,लक्ष्मण मोंडकर,शरद राणे,मधुसुदन राणे,सुरेश मांजरेकर,संतोष तळेकर,अजित लाड,प्रदिप धुरी,संतोष दळवी,महादेव तेली,शंकर गोसावी,मंगेश वाळिंबे,आत्माराम पडते,गंभाजी राणे,किशोर राऊत,शशी साटम,सुधीर कदम,राजेंद्र जाधव,संतोष घाडीगावकर,रामचंद्र पाटकर,सुरेखा मेजारी,प्रफुल्लता राणे,मनीषा वालावलकर,अर्चना मोरजकर,छाया फणसळकर,दीपा नाडकर्णी,प्रणिता गावडे,विदुला कुलकर्णी,मीना पारकर,वनिता सावंत,रत्नप्रभा तावडे,ज्योत्स्ना मेस्त्री,वैशाली कोरगांवकर आदी मैत्री परिवारातील मित्रमैत्रिणी सहभागी झाले होते.