आंबा-काजू झाडावरील रोगाने, बागायतदार पुन्हा यावर्षी संकटात !

फवारण्यांना रोग आवरेना; कृषी विभाग निष्क्रिय

फोंडाघाट (प्रतिनिधी) : तालुक्यातील फोंडाघाट भागातील आंबा- काजू बागायतदार चालू वर्षी देखील झाडावरील विचित्र कीटक रोगामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. पाऊण महिन्यापूर्वी दोन दिवस पडलेल्या थंडीमुळे झाडांना भरघोस मोहर फुटला होता. विद्यापीठाच्या निकषाप्रमाणे बागायतदारांनी पहिली- दुसरी फवारणी सुद्धा केली. मात्र मध्यंतरी पडलेल्या पावसाने सगळा मोहर काळा पडून झाडाखाली पेर झाला आणि फक्त काटक्या उरल्या. त्यानंतर झाडावर खार पडून, विचित्र कीटक रोगांनी नवीन आलेला मोहर तोडून टाकला आहे. यावरती महागड्या रोगांची फवारणी करून सुद्धा कीटकांवर त्याचा काही परिणाम अथवा नाश झालेला नाही किंवा रोग नियंत्रण आलेला नाही.

त्यामुळे एक तर कृषी विभागाचे फवारणी निकष अयोग्य आहेत ? अथवा महागडी कीटकनाशके जी शेतकरी ख . वि.संघातून बागायतदारांनी खरेदी केली, ती निकृष्ट दर्जाची आहेत का ? याबाबत तालुका कृषी विभाग निष्क्रिय असून, बागायतदारांनी उठाव केल्यावरच, कृषीतज्ञ, सहाय्यक बांधावर बागामध्ये फिरणार का ? की पंचनाम्यासाठी ? अश्या संतप्त भावना बागायतदार व्यक्त करीत आहेत. पावसामुळे संपूर्ण सीजन फळ उत्पादन रहित झाला असताना, कीटक रोगाचे थैमान आंबा- काजू बागायतदारांचे आर्थिक गणित, यावर्षी देखील उध्वस्त करणार ? अशी लक्षणे दिसून येत आहेत. याची कृषी विभागाने गंभीर दखल घेऊन नुकसानग्रस्त- बाधित बागायतदारांच्या फळ -पिकांच्या नुकसानीची पाहणी करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!