सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : वेंगुर्ले येथील हॉटेल वामन मध्ये बेकायदेशीर कुंटणखाना चालविल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेला अश्रफअली मुजावर ( रा. पिराचा दर्गा, वेंगुर्ले ) याचा जामीन जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी यशस्वी युक्तिवाद केला. तत्कालीन वेंगुर्ले पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी धडक कारवाई करत वेंगुर्ले शहरातील वामन हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर धाड घालून वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या पीडित महिलेला ताब्यात घेतले होते. तर हा वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या अश्रफअली मुजावर याला अटक केली होती. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या अश्रफअली याने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.त्याला हरकत घेत अतिरिक्त सरकारी अभियोक्ता तोडकरी यांनी जामीन नामंजूर करण्यासाठी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश गायकवाड यांनी अश्रफअलीचा जामीन फेटाळला.