शिवशंभो सामाजिक कला- क्रीडा मंडळाचे उस्फुर्त नियोजन !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : सलग तिसऱ्या वर्षी शिवशंभो सामाजिक कला- क्रीडा मंडळाने, सोमवार तारीख १९ फेब्रुवारी २४ रोजी “शिवजन्मोत्सव सोहळा २०२४” चे आयोजन केले आहे. फोंडाघाट येथील पांगळेवाडी, गडगेसकल, सुतारवाडी, वाडेकरवाडी यांचे संयुक्त विद्यमाने, सह्याद्री पर्वतांच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर, कुळाचीवाडी फोंडाघाट येथील भवानी चौक, शिवस्मारकाच्या सानिध्यात हा सोहळा संपन्न होणार आहे.
सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची जंगी मिरवणूक, ढोल- ताशांच्या गजरात, यामध्ये शिवरायांचे मावळे- भालदार- चोपदार, पारंपारिक वेशभूषेतील महिला- पुरुष आणि युवाई सहभागी होईल. भवानी चौकातील शिवस्मारकांमध्ये महाराजांचे पूजन, त्याच वेळी बिडवाडी ग्रुप ऐतिहासिक काळातील मल्लखांब, लाठीकाठी, तलवारबाजी ची प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. त्यानंतर श्री सत्यनारायण पूजा, आरती, महाप्रसाद, सायंकाळी महिलांसाठी हळदीकुंकू आयोजित केले आहे.स्थानिक भजन मंडळांना यावेळी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. रात्री अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ, म्हापण, तालुका- वेंगुर्ला यांचे महान पौराणिक नाटक “संत कान्होपात्रा” होणार आहे. सोहळ्यात पंचक्रोशीतील शिवप्रेमींनी सहभागी व्हावे,असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अशोक लाड,सचिव गुरुनाथ मेस्त्री, खजिनदार अनिल लाड आणि मंडळाचे शिवप्रेमी सदस्यांनी केले आहे.













