मुंबई इंडियन्स (MI) ज्युनियर टुर्नामेंट मध्ये सिंधुदुर्ग चा सुपुत्र श्लोक सत्यवान नर याची दमदार शतकी खेळी..!

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई येथील आझाद मैदान येथे झालेल्या १४ वर्षांखालील एम. आय. ज्युनियर टुर्नामेंट मध्ये मूळचा कुनकवण येथील बालमोहन विद्यामंदिर इंग्रजी माध्यम दादर शाळेच्या श्लोक सत्यवान नर यांनी शतकी खेळी केली. या स्पर्धेत बालमोहन विद्यामंदिर, दादरने दणदणीत विजय मिळविला. याबद्दल श्लोक नर यांचे जिल्ह्यातून अभिनंदन केले जात आहे.

श्लोक याने 2020 सालापासून रंगारी बदक चाळ लालबाग येथे क्रिकेट खेळाची सुरुवात केली. तत्पूर्वी श्लोक फुटबॉल खेळायचा. मात्र, 2020 पासून क्रिकेट खेळात आपली दमदार कामगिरी करत श्लोक याने चमक दाखवली. यापूर्वीही 83, 63, 104 अशी दमदार कामगिरी करत आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवली आहे. अदित्य कदम, गणेश मोरे, प्रदीप चव्हाण, निखिल अजगावकर यांच्याकडे श्लोक क्रिकेटचे धडे घेत आहे.

१४ वर्षांखालील एम. आय. ज्युनियर टुर्नामेंट मध्ये बालमोहन विद्यामंदिर इंग्रजी माध्यम दादर विरुद्ध रायन इंटरनॅशनल स्कूल, नेरुळ सामन्यात बालमोहन विद्यामंदिर, दादरने दणदणीत विजय मिळविला. संघासाठी खेळताना श्लोक सत्यवान नर याने ६३ चेंडूत १६ चौकार १ षटकार लगावत १०४ धावांचा डोंगर रचला. तर विवान रेडकरने ७४ चेंडूत ५२ धावा केल्या. तसेच, वेद खंबाटे याने ६ ओव्हर मध्ये ३६ धावा देत ०३ विकेट घेतले आणि संघासाठी विजय खेचून आणला.

या स्पर्धेत श्लोक याने केलेल्या दमदार फलंदाजीमुळे त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. बालमोहन विद्यामंदिरच्या यशाबद्दल शाळेचे प्रशिक्षक आदित्य कदम, गणेश मोरे, शिक्षक व क्रिकेट प्रेमींनी अभिनंदन केले

error: Content is protected !!