जिल्ह्यास्तरावर प्राप्त केला प्रथम क्रमांक
विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली जिल्ह्यातील एकमेव शाळा
कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी,मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. काॅलेज ऑफ आर्ट्स अँड काॅमर्स,तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. काॅलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर कनेडी या प्रशालेने ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” स्पर्धेमध्ये संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला असून विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली जिल्ह्यातील एकमेव शाळा ठरली आहे. जिल्ह्यातील २२६ माध्यमिक शाळांमधून प्रथम क्रमांक प्राप्त करत प्रशालेने रू. ११ लाख रूपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले आहे हे विशेष गौरवास्पद आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेमध्ये कायम १००% निकालाबरोबरचं शिष्यवृत्ती परीक्षा, NMMS परीक्षा, विज्ञान प्रदर्शन, ज्युनि. न्यूटन टॅलेंट सर्च परीक्षा, ऑलंपियाड परीक्षा, BDS परीक्षा, गणित संबोध परीक्षा, इतर स्पर्धा परीक्षा, वक्तृत्व, निबंध, वादविवाद स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा, पाठांतर स्पर्धा, विविध क्रीडा स्पर्धा यामध्ये या प्रशालेमधील मुले कायमच आघाडीवर दिसतात. क्रीडा स्पर्धांमध्ये तर कॅरम या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय पातळीवर देखील रौप्यपदक विजेते स्पर्धक प्रशालेमध्ये आहेत ही शाळेची संपूर्ण राज्यात एक वेगळीच ओळख आहे. कराटे मध्ये अगदी ब्लॅक बेल्ट प्राप्त केलेले विद्यार्थी सुद्धा प्रशालेमध्ये शिक्षण घेत आहेत.
माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशाला स्वच्छता अभियान राबविण्याच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर असते. केवळ शालेय परिसराची स्वच्छताचं नाही तर सांगवे व भिरवंडे गावातील मंदिरे, सार्वजनिक पाणवठे, चर्च, आरोग्य केंद्र, वृद्धाश्रम या ठिकाणांची स्वच्छता सुद्धा प्रशालेतील विद्यार्थी गेली ४५ हून अधिक वर्षे करत आहेत हे विशेषचं म्हणायला हवे.
केवळ पाठ्यपुस्तकातील शिक्षण पुरेसे नाही तर आज व्यावसायिक शिक्षण गरजेचे आहे हे ओळखून क.ग.शि.प्र.मंडळ, मुंबई चे अध्यक्ष सतीश सावंत यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी इलेक्ट्रॉनिक व शिवणकाम यांचे वर्ग देखील यापूर्वीचं सुरू केलेले आहेत.