आचरा विभाग प्रमुख चंद्रकांत गोलतकर यांनी किरण सामंत यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन
आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पळसंब गाव कृषी पर्यटन गाव घोषित व्हावा याबाबत आचरा शिवसेना विभाग प्रमुख चंद्रकांत गोलतकर यांनी किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या मार्फत आज आंगणेवाडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की आम्ही पळसंब (मालवण, सिंधुदुर्ग )गावाबाबतच्या महत्वाच्या मागणीकडे या विनंती पर पत्राद्वारे आपले लक्ष वेधू इच्छितो. मालवण तालुक्यातील पळसंब हा गाव सात वाड्यांचा गाव आहे. गेल्या काही वर्षात गावातील तरुणांच्या माध्यमातून गावात सकारात्मक आणि विकासात्मक बदल करण्याचे प्रयत्न असून शेती, पर्यटन, पशुपालन यांचा मेळ साधून गावात पुन्हा एकदा नवी ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. या आमच्या प्रयत्नांना तुमची साथ आवश्यक आहे. त्यासाठी गावाला कृषी पर्यटन गाव घोषित केल्यास आमच्या या प्रयत्नांना यशच मिळणार आहे. गावात ओहोळ, मुबलक पाणी आणि धरणे यांची सुविधा असल्याने गाव पातळीवर पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा आता पर्यंत प्रयत्न आम्ही केला आहे. यात नियोजनबद्ध सामूहिक शेती, दुग्ध व्यवसाय यांचा समावेश आहे. तुमची साथ लाभली तर गाव कृषी पर्यटन गाव होऊन गावातील आतापर्यंत होणारे स्थलांतर कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.