बांदा गडगेवाडीतील हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग

पटेल बंधूंचे मोठे आर्थिक नुकसान

बांदा (प्रतिनिधी) : बांदा शहरातील दोडामार्ग रस्त्यावरील गडगेवाडी येथे असलेल्या कल्पना ट्रेडर्स या दुकानाला मंगळवारी मध्यरात्री भीषण आग लागून पटेल बंधूंचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

आगीची माहिती मिळताच सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ व दोडामार्ग येथील अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत पहाटे सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविले.

प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दुकानात रंगसाहित्य तसेच लाकडी फर्निचर मोठ्या प्रमाणात साठवलेले असल्यामुळे आग झपाट्याने पसरली आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

दरम्यान, आगीची माहिती मिळताच बांदा परिसरातील शेकडो नागरिक घटनास्थळी धावून आले व मदतकार्य केले. स्थानिकांच्या सहकार्यामुळे आग आटोक्यात आणण्यास मोठी मदत झाली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पटेल बंधूंचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

या ठिकाणी वेंगुर्ला नगर परिषदेचे फायरमन नरेश परब, ड्रायव्हर भाऊ कुबल तसेच कर्मचारी अजय जाधव व पंकज पाटणकर उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनीही मदतकार्य करत अग्निशमन दलाला सहकार्य केले.

error: Content is protected !!