उपसभापतीपदातून वरवडे गावविकासाला प्राधान्य – सोनू सावंत
कणकवली (प्रतिनिधी) : पंचायत समितीच्या उपसभापती निवडीनंतर माझ्या वरवडे गावात श्री लिंगेश्वर ऐक्यवर्धक मंडळ वरवडेच्या वतीने माझा झालेला सत्कार भावी वाटचालीसाठी प्रेरणादायी आहे. पंचायत समिती सदस्यपदी माझी बिनविरोध निवड झाली त्यामागे माझ्या गावाचा वाटा मोठा आहे. तसेच मी कुठल्याही क्षेत्रात यशस्वी झालो तरी मला लिंगेश्वर मंडळाने नेहमी पहिली कौतुकाची थाप मारली आहे. अगदी मी ग्रामपंचायत सदस्य झालो तेव्हा पासून ते आज मी कणकवली पंचायत समिती उपसभापती निवडून आलो तेव्हा पण. मी दरवर्षी करत असलेल्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक उपक्रमात मला माझ्या वरवडे गावच्या ग्रामस्थांचे नेहमीच सहकार्य लाभले. त्यामुळेच मी समाजकारण आणि राजकारणात जनतेच्या हिताला प्राधान्य देऊ शकलो. उपसभापती पदाच्या माध्यमातून वरवडे गावच्या विकासासाठी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहीन असे प्रतिपादन कणकवली पंचायत समितीचे नूतन उपसभापती राजेश उर्फ सोनू सावंत यांनी केले.
कणकवली पंचायत समितीच्या उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल राजेश उर्फ सोनू सावंत यांचा श्री लिंगेश्वर ऐक्यवर्धक मंडळ वरवडे परबवाडीच्या वतीने श्री लिंगेश्वर सभागृहात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. मंडळाचे अध्यक्ष सुनील परब व मंडळाचे जेष्ठ सल्लागार मधुकर परब यांच्या हस्ते सोनू सावंत यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना सोनू सावंत बोलत होते.
यावेळी बोलताना मंडळाचे जेष्ठ सल्लागार शिवराम परब म्हणाले की सोनू सावंत यांच्या रूपाने वरवडे गावचा सुपुत्र आज कणकवली पंचायत समितीच्या उपसभापती विराजमान झाला आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. उपसभापती पदाच्या आणि पंचायत समिती सदस्यपदाच्या काळात गावातील विकासकामे सोनू सावंत मार्गी लावतील यात दुमत नाही. यावेळी माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष हनुमंत बोंद्रे यांचाही शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वरवडे तंटामुक्त समिती अध्यक्ष संदीप घाडी, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप घाडी, अनुश्री परब, महेश कदम, संतोष कदम, सिताराम परब यांच्यासह परबवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.












