वटवृक्ष मंदिरात रात्री १० ते १२ या वेळेत लघुरुद्र व महाआरती
मसुरे (प्रतिनिधी) : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात ८ मार्च २०२४ माघ वद्य त्रयोदशी रोजी महाशिवरात्री संपन्न होत आहे. या दिवशी सकाळी ७:३० वाजता भाविकांच्या वतीने स्वामींना होणारे मंदिरातील अभिषेक होतील. या दिवशी भाविकांची स्वामी दर्शनाकरिता गर्दी झाल्यास महाशिवरात्री रोजी भाविकांना टप्प्याटप्प्याने दर्शनास सोडण्यात येईल. तरी भाविकांनी मंदिरात आल्यानंतर सुरक्षितपणे दर्शन घेऊन माघारी जावे असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन / नगरसेवक महेश इंगळे यांनी केले आहे. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरातील दिनचर्येत व स्वामींच्या नित्योपचारात पारंपारीक पध्दतीचे बदल करण्यात आले आहेत. सालाबाद प्रमाणे सकाळी ११:३० वाजता नित्यनेमाने होणारी नैवेद्य आरती व रात्री ७:४५ ते ८:४५ या वेळेत होणारी शेजारती महाशिवरात्रीमुळे होणार नाही. रात्री १० वाजता पुरोहीत मोहनराव पुजारी-मंदार महाराज पुजारी व ब्रह्मरुंदांच्या विधीवत मंत्रोच्चारात रुद्राभिषेक व रात्री बारा वाजता महाशिवरात्रीची महापूजा होऊन रात्री १२ वाजता श्रींची महाआरती होईल याची सर्व स्वामी भक्तांनी नोंद घ्यावी अशी माहिती महेश इंगळे यांनी याप्रसंगी दिली.