एकजण जखमी : धामापूर येथील घटना ; पळून जाणारा ट्रक काळसे येथे पकडला
चौके (अमोल गोसावी) : भरधाव वेगाने चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकने धामापूर येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकींना धडक दिल्याची घटना आज गुरुवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकी अंगावर पडल्याने मालवण वायरी येथील कुंदन सहदेव हुर्णेकर हा तरुण जखमी झाला. तर एकजण सुदैवाने बचावला आहे. दरम्यान, काही तरुणांनी त्या ट्रकचा पाठलाग करून ट्रक पकडला. मात्र, चालक झाडी झूडपात पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत होते.
भरधाव वेगातील चिरे वाहतूक करणारा ट्रक केए 22 सी 8334 हा चौके येथून कर्नाटकला चिरे भरणा करून जात होता. धामापूर भगवती मंदिर समोरील वळणावर काही तरुण आपल्या दुचाकी रस्त्याच्या बाजूला उभ्या करून मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यातील कुंदन हुर्णेकर हा आपल्या गाडीच्या जवळ येत असताना चौकेच्या येथून येणाऱ्या ट्रकने तेथील एका दुचाकीला धडक दिली. ही दुचाकी कुंदनच्या अंगावर पडून कुंदन रस्त्याच्या खाली फेकला गेला. त्याचवेळी ट्रकने कुंदनच्या बुलेटला धडक दिली. बुलेट रस्त्याच्या खाली जाऊन पडली. तर याच ठिकाणी प्रवाश्याना बसण्यासाठी असलेल्या सिमेंट बेंचलाही ट्रकने धडक दिल्याने त्याचे तुकडे तुकडे झाले. त्या बेंचवर एक सेंट्रिंग कामगार बसला होता. तो काही मिनिटपूर्वी उठून निघून गेल्याने सुदैवाने तो बचावला.
ट्रकचा पाठलाग अपघात घडल्यानंतर ट्रक काळसे कुडाळच्या दिशेने भरधाव वेगाने निघून जात होता. कुंदन तसेच तेथील काही युवकांनी दुचाकीने ट्रकचा पाठलाग केला. काळसे येथे काही अंतरावर एका वळणावर रस्त्याच्या बाजूला ट्रक मातीच्या चरात जाऊन अडकला. त्याचवेळी चालकाने झाडी झुडपाच्या दिशेने पळ काढला. पोलीस घटनास्थळी दाखल अपघाताची माहिती मिळताच मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते. अपघातग्रस्त दुचाकींचा पंचनामा करण्यात आला. तसेच ट्रक चालकाचा शोध घेण्यात येत होता.
काळसे धामापूर या टप्प्यात सातत्याने अपघात होत असतात. याठिकाणी भरधाव वेगातील ट्रक, डंपर यांना आवर घालण्याची मागणी सातत्याने पुढे येत आहे. तसेच अन्य उपाययोजना म्हणून धामापूर भगवती मंदिर समोरील रस्त्यावर स्पीड ब्रेकर घालावेत अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीनेही करण्यात आली. त्यावर कार्यवाही करावी अशी मागणी यानिमित्ताने पुढे आली आहे.