खारेपाटण (प्रतिनिधी) : घरटं पाखरांचं असो की माणसांचं. घरटं आणि घर , संसार उभारायला पाखरांना आणि माणसांनाही खूप कष्ट घ्यावे लागतात. पण हेच घरटं अथवा घरकुल जेव्हा एखाद्या आकस्मिक कारणानं अपघात होवून उन्मळून पडतं. तेव्हा माणसं असोत की जीवसृष्टी तील प्राणी-पक्षी. त्यांच्या दुःखाला सिमा राहत नाही. पारावार राहत नाही.काही दिवसांपुर्वी असंच मुंबईतील मालाड-आप्पापाडा जामृशीनगर येथील हातावर पोट असणा-या, मुंबईनगरीत काबाड कष्ट करून चिल्यापिल्यांचं पोट भरणा-या सामान्य गोरगरीब, श्रमजीवी माणसांच्या झोपडपट्टीला अचानकपणे आग लागली.
या वेळी या वस्तीतील जवळपास १५ घरगुती गँस सिलेंडरचे स्फोटामागून स्फोट झाले. प्रचंड आग आणि धुराचे लोट लोटले. आणि ५०-६० घरांची मनुष्यवस्ती डोळ्यासमोर बेचिराख झाली. एका किशोरवयीन बालकाचाही या आगीच्या ठिकाणी जागीच दुर्दैवी मृत्यु झाला होता.
प्लँस्टिक चे छत आणि भिंती असणा-या सर्व झोपड्यांमधील संसारांची आज तेथे उरलीय केवळ राख....या झोपड्यांमधील कुटुंबांचे कपडे, अंथरूणं-पांघरूणं , भांडी, मुलांच्या शाळेची दफ्तरं....घरातचे , टिव्ही, टिव्हीच्या डिश, मौल्यवान वस्तू इत्यादी सगळाच्या सगळा संसार आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून राख झालाय.कुटुंबातील सदस्यांची आधारकार्ड, पँनकार्ड, रेशनकार्ड सह मुलांची मुलभूत शालेय कागदपत्रे इ. जळून गेलीत.
आगीमधे जामृशीनगरातील सर्व संसार भस्मसात झालेल्या येथील नागरिक बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी मुंबई परिसरात कार्य करणा-या संस्था आता पुढे सरसावल्या आहेत.त्यापैकीच समाजसेविका सारा डिमेलो यांनी स्थापन केलेली सिसिडिटी ही एक संस्था.सिसिडिटी संस्थेतील चाईल्डलाईन टिमने नुकतेच दोन दिवस संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त श्रीम.सुकन्या पोद्दार यांच्या मार्गदर्शनानुसार जामृशीनगर वस्तीतील बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी आवश्यक संयोजन केले. आणि श्री.सि.के. रामाणी यांनी दिलेल्या मदतीतून जीवनोपयोगी वस्तूंचे ६७ किट्स ज्यामधे बेडशीट,चादर,टाँवेल, जीवनावश्यक किराणा साहित्य, बिस्किट्स इत्यादी साहित्याचे किट्स आज प्रत्यक्ष वस्तीत वाटण्याचे या टिमने कार्य केले.
जळीत कुटुंबांची नेमकी गरज ओळखून मदत करण्यासाठी एक दिवस आधी संस्थेच्या टिमने वस्तीमधे जावून प्रत्यक्ष सर्वे केला. सिसिडिटी संस्था गेल्या ३२ वर्षांपासून मुंबई आणि मुंबईच्या बाहेर समाजातील दुर्बल घटकांचे आरोग्य आणि आहार, किशोरवयीन बालकांचे संरक्षण व सक्षमीकरण, युवकांचा कौशल्य विकास इ.मुद्यांवर कार्यरत आहे.
जामृशीनगरमधील बांधवांसाठी अजूनही जीवनावश्यक वस्तूंसह, कपडे व मुलांच्या शालेय साहित्याची नितांत आवश्यकता असून मुंबईतील नागरिक आणि संस्थानी सहाय्य करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन सिसिडिटी संस्थेकडून करण्यात आले आहे.