भारतीय महिला क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू प्रकाशिका नाईक हीचा चौके हायस्कूल येथे सत्कार

चौके पंचंक्रोशीत लवकरच क्रिकेट अकॅडमी स्थापन करणार – प्रकाशिका नाईक

चौके (प्रतिनिधी) : भारतीय महिला क्रिकेट संघात अष्टपैलू म्हणून निवड झालेली मालवण तालुक्यातील आंबडोस गावची सुकन्या कु.प्रकाशिका प्रकाश नाईक आपल्या वडिलांसोबत काही दिवसासाठी आमडोस येथे आपल्या गावी आल्या होत्या. गेल्याच महिन्यात मालवण येथे झालेल्या 14 वर्षाखालील शालेय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत चौके हायस्कूलच्या संघाने लेदर बॉलचा कोणताही सराव नसताना सांघिक कामगिरीच्या जोरावर अंतिम सामन्यात प्रवेश करत उपविजेता ठरला होता. ही बातमी महिला क्रिकेटपटू प्रकाशिका नाईक यांना समजली होती. त्याचवेळी त्यांनी गावी आल्यावर या क्रिकेट टीमला भेट देणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी सोमवारी सकाळी चौकेतील भ.ता.चव्हाण, म. मा.महाविद्यालय या प्रशालेला भेट दिली. यावेळी या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी कु.प्रकाशिका यांचे पुष्पवृष्टी करत टाळ्यांच्या गजरात जोरदार स्वागत केले.चौके पंचाक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई- संचलित भ.ता.चव्हाण, म. मा. विद्यालय,चौके तसेच स्थानिक संस्था यांच्या वतीने संयुक्तिक शाल श्रीफळ देऊन प्रकाशिका हिचा सत्कार करण्यात आला यावेळी या प्रशालेचे स्थानिक समितीचे अध्यक्ष बिजेन्द्र गावडे, संस्था उपाध्यक्ष विनायक गावडे,शंकर गावडे,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष मोहन गावडे,शिक्षक विजय डगला सर,ग्रामस्थ उदय गावडे,प्रकाशिका चे वडील प्रकाश नाईक भाऊ दीपक नाईक आत्या प्रतिमा म्हात्रे,बाळकृष्ण नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना क्रिकेटपटू प्रकाशिका नाईक यांनी शालेय जीवनापासून क्रिकेट खेळत आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये स्थान मिळवण्यापर्यंतचा प्रवास सांगितला. सुरुवातीला अपयश आले मात्र जिद्द आणि सातत्य ठेवल्याने मला सर्व साध्य करता आले. विद्यार्थ्यानीही शालेय जीवनात आपल्यातील असलेले कलागुण ओळखून आपल्या आवडीच्या क्षेत्रात सातत्य ठेवावे. सुरुवातीला अपयश मिळेल त्यात खचून न जाता जिंकण्याची जिद्द ठेवावी असेही सांगितले.यावेळी गेल्या महिन्यात मालवण येथे 14 वर्षाखालील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत चौके हायस्कूल चा संघ उपविजेता ठरला होता या संघाचे कौतुक करत संघात खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्याला इंग्लंड, ऑस्ट्रेलिया येथे क्रिकेट खेळताना मिळालेल्या जर्सी या विद्यार्थ्यांना देत अभिनंदन केले. व लवकरच या शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले.

चौके पंचक्रोशीत लवकरच क्रिकेट अकॅडमी सुरु करण्याचा आपला मानस असल्याचे क्रिकेटपटू प्रकाशिका तसेच तिचे वडील प्रकाश नाईक यांनी सांगितले.जेणेकरून आपल्या या भागातील तरुण क्रिकेटपटू जिल्हा,राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर खेळतील आणि आपल्या गावाचे नाव मोठे करतील.तसेच या शाळेच्या मैदानात पुढच्या महिन्यात क्रिकेट प्रॅक्टिस साठी नेट व क्रिकेटचे किट उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.यावेळी व्यासपीठावर उपस्थित शिक्षक विजय डगला,प्रकाश नाईक, बिजेंद्र गावडे, मोहन गावडे,यांनी प्रकाशिका नाईक यांचे कौतुक करून विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा असे मार्गदर्शन केले.व प्रकाशिका साठी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमचे सूत्रसंचालन आणि आभार सौ.परब यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!