खारेपाटण (प्रतिनिधी) : १४ मे १९३८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली कणकवली येथे संपन्न झालेल्या पहिल्या कोकण महाल महार परिषदेच्या प्रेरणेतून सिंपन प्रतिष्ठान, मुंबई अर्थात सिंधुदुर्ग परिवर्तन नवनिर्माण ही सेवाभावी संस्था २०१८ मध्ये उदयास आली. त्या अनुषंगाने सकारात्मक व व्यापक दृष्टीकोन ठेवून, बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकणभूमीत अर्थात कणकभूमीत त्यांच्या अनमोल विचारांच स्मारक शिल्प आणि चळवळीला प्रेरणा देणारे संशोधन केंद्र उभारुन उपेक्षित, बहुजन समाजाकरिता विविध उपक्रम राबविण्याचा सिंपन प्रतिष्ठानचा मानस आहे.
१९३८ सालच्या पहिल्या सामाजिक परिषदेच्या प्रेरणादायी स्मृती जतन करण्याकरिता प्रतिवर्षी १४ मे हा परिवर्तन दिन साजरा केला जातो. त्या दिवशी कणकवली येथे जयंती महोत्सवात नेत्र तपासणी, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर, औषधांचे मोफत वाटप, कार्यशाळा, चर्चासत्र अशा समाजपयोगी विविध उपक्रमांचे आयोजन करुन संस्थेचे मार्गदर्शक कालकथित प्रा. रमाकांत यादव सरांच्या नावे ‘जीवन गौरव’ पुरस्कार तर संस्थेचे प्रेरणास्थान कालकथित प्रा. विजय जामसंडेकर सरांच्या नावे विजयीभव पुरस्काराने महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तींना गौरविण्यात येते.
२८ एप्रिल २०२४ रोजी सिंपन परिवार स्नेह मेळाव्यानिमीत्त ओंकार भोजणे आणि भाऊ कदम अभिनीत ‘करुन गेलो गाव’ हे रंगभूमीवर गाजत असलेल्या नाटकाचा विशेष प्रयोग शिवाजी नाट्य मंदिर दादर येथे, सकाळी १०:३० वाजता आयोजित केला आहे. सदर स्नेह मेळाव्याला विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार असल्याचे सरचिटणीस बाळकृष्ण जाधव यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.












